मुंबई – ठाकरे गटाच्या बालेकिल्ल्यांत भाजपने दिवाळीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. भाजपने दादर वरळी, गिरगाव, बांद्रा आदी भागांतील प्रमुख कार्यक्रमांसह संपूर्ण मुंबईत तब्बल 233 कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. मंगळवारी दादर शिवाजी पार्क, राजा बढे चौक येथे तसेच पहाटे 6 वाजता गिरगावात दिवाळी पहाटचा कार्यक्रमाचे आयोजन केले होते. शिवाजी पार्क, राजा बढे चौक येथील भाजपाच्या कार्यक्रमात गायकांनी श्रोत्यांना आपल्या सुमधुर आवाजाने मंत्रमुग्ध केले. या कार्यक्रमात अनिरुद्ध जोशी, सोनाली कुलकर्णी, दत्तात्रेय मेस्त्री, अद्वैता लोणकर या गायकांनी गायन केले. दरम्यान, मुंबई पालिका निवडणुकांवर लक्ष ठेऊन मराठी मतदारांना आकर्षित करण्याच्या उद्देशाने भाजपाने विविध मराठमोळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यास काही महिन्यांपासून सुरुवात केल्याचे बोलले जात आहे.