संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 06 July 2022

शिवाजी महाराजांबद्दल राज्यपालांचे वादग्रस्त वक्तव्य; राष्ट्रवादी-शिवसेना आक्रमक

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी औरंगाबाद येथील एका कार्यक्रमात ‘समर्थांशिवाय शिवाजी महाराजांचं स्थान काय?’ असं विधान केले होते. समर्थ रामदास हे शिवरायांचे गुरू असल्याचे सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्यावर आता राज्यभरातून तीव्र पडसाद उमटण्यास सुरुवात झाली आहे. सोलापुरात शिवसेनेच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ आंदोलन करून निषेध करण्यात आला. तसेच पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जोरदार आंदोलन करण्यात आले. यावेळी राज्यपालांनी माफी मागावी अशी मागणी करण्यात आली. खासदार उदयनराजे यांनी ट्विट करत राज्यपालांनी हे वक्तव्य मागे घेण्याची मागणी केली आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काल औरंगाबाद येथे समर्थ साहित्य परिषदेच्या कार्यक्रमात बोलताना छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाचे राज्यातील राजकारणात देखील पडसाद उमटले आहेत. शिवसेना नेते संजय राऊत यांनी राज्यपाल कोश्यारींसह भाजपवर टीका केली आहे. भाजपने आता नवीन शिवव्याख्याते निर्माण केले आहेत, असा टोला लगावतानाच त्या संदर्भात आता भाजपनेच भूमिका स्पष्ट केली पाहिजे, असे संजय राऊत यांनी म्हंटले आहे.

खासदार उदयनराजे यांनी ट्विट करत राज्यपालांनी हे वक्तव्य मागे घेण्याची मागणी केली आहे. ‘राष्ट्रमाता जिजाऊ या छत्रपती शिवाजी महाराजांच्या खऱ्या गुरू होत्या तर रामदास हे कधीही गुरु नव्हते. हा खरा इतिहास आहे. तरीही औरंगाबाद येथील एका कार्यक्रमात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदास यांचा संदर्भ देवून चुकीचा इतिहास सांगितला आहे. खरं तर राज्यपालांनी आपल्या पदाची मर्यादा ठेवून वक्तव्य करायला हवे होते. त्यांच्या वक्तव्यामुळे शिवप्रेमींसह संपूर्ण महाराष्ट्राच्या भावना दुखावल्या आहेत. तरी राज्यपाल कोश्यारी यांनी आपले वक्तव्य त्वरित मागे घ्यावे’, असे उदयनराजे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

यावेळी सुप्रिया सुळे यांनी राज्यपालांच्या विधानाचा समाचार घेतला. त्यांनी एक ट्विट करून मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने दिलेल्या एका निकालाचे काही फोटो शेअर केले आहेत. तसेच, मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दि. १६ जुलै २०१८ रोजी दिलेल्या निकालानुसार, तपास अधिकाऱ्यांनी इतिहासतज्ज्ञ आणि इतर अभ्यासकांची मते विचारात घेतल्यानंतर न्यायालयात सादर केलेल्या पुराव्यांनुसार छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदास यांची भेट झाल्याचा कोणताही पुरावा नाही, असे सुप्रिया सुळे यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे.

भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांच्याबाबत केलेल्या विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. मराठा संघटना आणि अभ्यासकांनी कोश्यारी यांनी तातडीने माफी मागावी अशी मागणी केली आहे. तसेच मराठा आरक्षणासाठी न्यायालयीन लढा लढणारे विनोद पाटील यांनीही राज्यपालांनी याबाबत जाहीर माफी मागावी अन्यथा आम्ही सर्व शिवभक्त आपले धोतर फेडण्यास मागेपुढे पाहणार नसल्याचे म्हटले आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami