मुंबई:- बिग बॉस १६ चा उपविजेता शिव ठाकरेने शनिवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली. यावेळी शिवसोबत मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकरही उपस्थित होते. शिवने राज ठाकरेंची सदिच्छा भेट घेतली. राज ठाकरेंच्या ‘शिवतीर्थ’ या निवासस्थानाबाहेरुन शिवचा एक व्हिडिओ समोर आला.
शिवने यानंतर मीडियासोबत संवाद साधला. तुझा मनसे आणि राज ठाकरेंकडे कल जास्त वाढतोय असे शिवला विचारण्यात आले. तेव्हा शिवने हसून या प्रश्नाचे उत्तर दिले. तुमचा प्रश्न चांगला आहे. पण मला पक्ष आणि राजकारणापेक्षा तिथल्या माणसांची कदर आहे. जेव्हा मी कोणी नव्हतो तेव्हा राजसाहेब आणि अमेय खोपकर हे माझ्या सोबत होते. त्यांनी आत्ताही माझे कौतुक केले आणि माझे अभिनंदन केले. बिग बॉस सारखा हिंदी शो एका मराठी माणसाने गाजवला याचा त्यांना अभिमान आहे.
बिग बॉस १६ चा उपविजेता शिव ठाकरे या पर्वाच्या विजेत्यापेक्षा अधिक चर्चेत आहे. गेल्या काही दिवसात शिव ठाकरे विविध माध्यमे, ऑनलाइन पोर्टल्स, वर्तमानपत्रे यांना मुलाखती देत आहे. शिव लवकरच एका बड्या रिअॅलिटी शोमध्ये दिसणार आहे.