बुलढाणा – शेगाव तालुक्यातील पहुरजिरा येथे शेतात कांदा लावत असताना मधमाशांनी अचानकपणे मजुरांवर हल्ला केला. या हल्ल्यात २ जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली असून जखमींना खामगाव उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले होते. मात्र दोघांची प्रकृती गंभीर असल्याने दोघांना अकोला येथील रुग्णालयामध्ये उपचारासाठी पाठविण्यात आले आहे.
शेगाव तालुक्यातील पहुरजिरा येथे काल गुरुवारी कौशल्याबाई किसन पाघृत (५५) या शेतात कांदा लावत असताना मधमाशांनी त्यांच्यावर हल्ला केला. तर, त्यांना वाचवण्यास मुरलीधर शालिग्राम पाघृत (४२) हे गेले असता त्यांच्यावरसुद्धा मधमाशांनी हल्ला केला. यात दोघेही गंभीर जखमी झाले. शेतातील लोकांनी त्यांना सामान्य रुग्णालयात उपचारासाठी भरती केले असता डॉक्टरांनी त्यांची तपासणी करून पुढील उपचारासाठी त्यांना अकोला येथे पाठविले.