उत्तर प्रदेश- उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीला 10 फेब्रुवारीपासून सुरूवात होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजपने आज पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह अनेक नेत्यांच्या उपस्थितीत ’लोक कल्याण ठराव पत्र’ हा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. या जाहीरनाम्यात, सर्व शेतकर्यांना सिंचनासाठी मोफत वीज देण्यात येणार असून पाच हजार कोटींची कृषी सिंचन योजना सुरू होणार, ऊस उत्पादक शेतकर्यांना 14 दिवसांत पैसे दिले जाणार, विलंब झाल्यास त्या रक्कमेवर व्याज दिले जाईल, राज्यातील प्रत्येक विधवा आणि निराधार महिलेला दीड हजार रुपये पेन्शन मिळेल, सहा मेगा फूड पार्क उभारण्यात येणार आहेत तर पाच हजार कोटींच्या गुंतवणुकीसह सरदार पटेल कृषी-पायाभूत सुविधा अभियान राबवण्यात येणार असल्याची घोषणा जाहीरनाम्यात करण्यात आली आहे.
यावेळी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले, भाजप येत्या 5 वर्षांत लोकांचे जीवन बदलण्यासाठी जाहीरनामा प्रसिद्ध करत आहे. पाच वर्षापूर्वीही भाजपने याच सभागृहात आपला जाहीरनामा सादर केला होता. उत्तर प्रदेशमध्ये कायद्याचे राज्य असून राज्यातील प्रत्येक मुलगी सुरक्षित आहे. 2017 च्या आधी राज्यात 700 दंगली झाल्या होत्या. उत्तर प्रदेशात आज संचारबंदी लागत नाही तर कावड यात्रा निघते. राज्यभरात सण-उत्सव आनंदात साजरे होत आहेत. 86 लाख शेतकर्यांना 36 हजार कोटी रूपयांचे कर्ज माफ करण्यात आले आहे. पाच लाख तरूणांना रोजगार मिळाला आहे. दरम्यान, उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचार आज सांयकाळी संपणार आहे. पहिल्या टप्प्यात राज्यातील 11 जिल्ह्यांतील शामली, मेरठ, मुझफ्फरनगर, बागपत, हापूर, गौतम बुद्ध नगर, गाझियाबाद, बुलंदशहर, मथुरा, आग्रा आणि अलीगढमधील 58 जागांसाठी 10 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. उत्तर प्रदेशमध्ये 10, 14, 20, 23, 27 फेब्रुवारीसह 3 आणि 7 मार्च रोजी सात टप्प्यांत मतदान होणार आहे. तर 10 मार्च रोजी मतमोजणी होणार आहे.