पारगाव- कोंथिबीर, मेथीच्या जुडीला केवळ 4 ते 5 रुपये बाजारभाव मिळत आहे. त्यामुळे पालेभाज्या काढणीची मजुरी, वाहतूक खर्चही वसूल होत नसल्याने शेतकऱ्यांनी मेथी, कोथिंबीर या पालेभाज्यांची काढणी थांबवली. अनेक शेतकऱ्यांनी या पालेभाज्यांच्या पिकांमध्ये जनावरे सोडली..
बाजारभावाची साथ मिळाल्यास या पिकांच्या विक्रीतून लाखो रुपये शेतकऱ्यांना मिळतात. तालुक्याच्या पूर्व भागातील पारगाव, शिंगवे, काठापूर, रांजणी, वळती, नागापूर, खडकी, पिंपळगाव, थोरांदळे आदी गावांपासून मंचर आणि नारायणगाव या बाजारपेठा नजीकच्या अंतरावर आहेत. त्यामुळे वाहतुकीचा खर्च कमी येतो. पालेभाज्यांच्या विक्रीतून शेतकऱ्यांना चांगले पैसे मिळतात. मात्र, सध्या हे सर्व धुळीस मिळाले असून गेल्या 15 दिवसांपासून मेथी, कोथिंबीर या पालेभाज्यांच्या बाजारभावात मोठी घसरण झाली आहे. शेकड्याला 400 ते 500 रुपये असा बाजारभाव मिळत असून या बाजारभावातून भांडवलदेखील वसूल होत नाही. पालेभाज्या काढणीची मजुरी, बाजारपेठेपर्यंतचा वाहतुकीचा खर्च देखील शेतकर्यांच्या अंगावर येतो. त्यामुळे या पिकांची काढणी शेतकऱ्यांनी थांबवली. अनेक शेतकऱ्यांनी जनावरे मेथी, कोथिंबीरीच्या उभ्या पिकांमध्ये सोडली.