नवी दिल्ली – निवडणूक आयोगाच्या कामकाजातील पारदर्शकतेबाबत दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने देशातील स्थिती चिंताजनक असल्याचे म्हटले आहे.तसेच सद्य परिस्थितीत दबावाला बळी न पडणाऱ्या दिवंगत टी.एन. शेषन यांच्यासारख्या व्यक्तीला निवडणूक आयुक्त बनवण्याची गरज असल्याचे स्पष्ट मत सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केले आहे.
न्यायमूर्ती अजय रस्तोगी, अनिरुद्ध बोस, हृषिकेश राय आणि सी टी रविकुमार यांच्या खंडपीठाने सांगितले की, ‘देशात अनेक मुख्य निवडणूक आयुक्त झाले आहेत आणि टीएन शेषन क्वचितच घडतात. असे आम्हाला वाटते. या दोन निवडणूक आयुक्त, एक मुख्य निवडणूक आयुक्त अशा तीन व्यक्तींच्या खांद्यावर राज्यघटनेने प्रचंड अधिकार दिले आहेत. सीईसी पदासाठी आपल्याला सर्वोत्तम व्यक्ती शोधावी लागेल. प्रश्न हा आहे की या पदासाठी आपण सर्वोत्तम व्यक्तीची निवड कशी करायची आणि नेमणूक कशी करायची? असा प्रश्न न्यायालयाला पडला आहे.सदस्यांच्या नियुक्तीत संसदेने सुधारणा करण्याची गरज आहे, त्यामुळे आयोगाच्या स्वातंत्र्यावरही परिणाम होत आहे,असे न्यायालयाने म्हटले आहे.सुनावणीत पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाने केंद्र सरकारसमोर अनेक प्रश्न उपस्थित केले. २००७ पासून सर्व मुख्य निवडणूक आयुक्तांचा कार्यकाळ पूर्ण होत नाही, यूपीए आणि सध्याच्या सरकारच्या काळातही आम्ही हे पाहिले आहे, असा सवाल न्यायालयाने केला.आम्ही संसदेला काहीही करण्यास सांगू शकत नाही आणि आम्ही तसे करणार नाही. १९९० पासून जो मुद्दा मांडला जात आहे त्यावर आम्हाला काहीतरी करायचे आहे.सध्या परिस्थिती चिंताजनक आहे ,असेही या त्रिसदस्यीय खंडपीठाने म्हटले आहे.