बंगळुरू – बॉलिवूड अभिनेते शक्ती कपूर यांचा मुलगा सिद्धांत कपूर याला ड्रग्स प्रकरणात पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी रविवारी रात्री बंगळुरूच्या एका हॉटेलमधील रेव्ह पार्टीवर छापा टाकल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. सिद्धांत त्या पार्टीत उपस्थित होता आणि त्याची चाचणी केली असता त्याने ड्रग्स घेतल्याचे समोर आले, असे कळते आहे. बंगळुरू पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ड्रग्ज सेवन करणाऱ्या ६ लोकांमध्ये त्याचा समावेश असून त्याला अलसूर पोलीस ठाण्यात नेण्यात आले आहे.
सिद्धांतने सहाय्यक दिग्दर्शक म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली. ‘भूल भुलैया’, ‘भागम भाग’, ‘चुप चुपके’ आणि ‘ढोल’ यांसारख्या चित्रपटांसाठी त्याने सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले आहे. २०१३ मध्ये त्याने संजय गुप्ता यांच्या ‘शूटआउट ऍट वडाळा’ या चित्रपटात काम केले होते. त्यानंतर तो ‘अग्ली’ आणि ‘भौकाल’ या वेबसीरिजमध्येही दिसला होता. दरम्यान, सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूनंतर ड्रग्ज प्रकरणात सिद्धांतची बहीण अभिनेत्री श्रद्धा कपूर हिची नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून चौकशी करण्यात आली होती. परंतु त्यातून काही निष्पन्न झाले नव्हते. मात्र आता मुलगा सिद्धांतच्या ड्रग्ज सेवनाच्या बातमीने वडील शक्ती कपूर यांना धक्का बसला आहे. पोलिसांना या पार्टीविषयी माहिती मिळाली होती, त्यानुसार त्यांनी सापळा रचून पार्टीवर छापा टाकला, तिथे सिद्धांत कपूरदेखील होता. पार्टीतील काही संशयितांना रक्त तपासणीसाठी पाठवण्यात आले. ज्यामध्ये काहीजणांनी अंमली पदार्थांचे सेवन केल्याचे समोर आले. यात सिद्धांत कपूरदेखील आहे.
माध्यमांनी यासंदर्भात शक्ती कपूर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी ‘सिद्धांत असं करुच शकत नाही’, अशी प्रतिक्रिया दिली. त्याचबरोबर सिद्धांत बंगळुरूत कुठल्या हॉटलमध्ये थांबला आहे हेदेखील कपूर कुटुंबियांना माहिती नव्हते किंवा तो कुठल्या पार्टीला जाणार याचीदेखील शक्ती कपूर यांना कल्पना नव्हती.