अहमदनगर – जिल्ह्यातील श्रीगोंदे तालुक्यातील शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्यात भीषण परवा गुरुवारी भीषण स्फोटाची घटना घडली होती. त्यामुळे कारखान्याची मळीची टाकी फुटून साडेचार हजार टन मळी परिसरातील शेतात आणि कारखान्यात घुसली होती. त्याची निर्माण झालेली दुर्गंधी अद्याप परिसरात जाणवत असून इथल्या नागरिकांना प्रदूषणाचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे हा कारखाना बंद ठेवण्याचा आदेश महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रक महामंडळाने दिला आहे.
या कारखान्याच्या मळी साठवण टाकीचे तापमान वाढल्याने हा स्फोट झाल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे ४ हजार टन मळी टाकीतून बाहेर पडली होती. या स्फोटामुळे शेजारची भिंतही पडली होती. सुदैवाने या स्फोटात कोणतीही जीवितहानी झाली नव्हती. मात्र कारखान्याचे तब्बल साडे चार कोटींचे नुकसान झाले होते.या घटनेनंतर कारखान्याचे उपाध्यक्ष बाबासाहेब भोस यांनी तत्काळ भेट देऊन तिथल्या अधिकाऱ्यांना योग्य ती पावले उचलण्याची सूचना केली आहे.या कारखान्यात साखर उत्पादना सोबत काही उपपदार्थ बनवले जातात. तर कारखान्याच्या अर्कशाळेतील टाक्यांमध्ये मळी साठवली जाते.याच टाकीचे आतील तापमान वाढल्याने हा स्फोट झाला होता.