कोलंबो – भारताचा शेजारी देश असलेला श्रीलंका सध्या प्रचंड मोठ्या आर्थिक संकटातून जात आहे. येथे पेट्रोल, डिझेलच्या दरांनी ४०० रुपयांचा टप्पा ओलांडला आहे, तर अन्नधान्याच्या किंमती एवढ्या वाढल्या आहेत की, ते खरेदी करणे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहे. अशातच श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू सर्वसामान्यांच्या मदतीसाठी धावून आला आहे. १९९६च्या विश्वचषक विजेत्या संघाचा भाग असलेला श्रीलंकेचा क्रिकेटपटू रोशन महानामा पेट्रोल पंपावर लोकांना जीवनावश्यक वस्तू पुरवताना दिसला. त्याने त्याच्या ट्विटर अकाऊंटवर काही फोटो पोस्ट केले आहेत, ज्यात तो लोकांना चहा आणि बन सर्व्ह करताना दिसत आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच श्रीलंकेच्या मंत्र्यांनी लोकांना गरिबी हटविण्यासाठी चहा कमी पिण्याचे आवाहन केले होते.
‘आम्ही वॉर्ड प्लेस आणि विजेरामा मावठाभोवती पेट्रोलसाठी रांगेत उभ्या असलेल्या व्यक्तींना चहा आणि बन देण्याचे काम केले. या रांगा दिवसेंदिवस लांबत चालल्या आहेत, अशा स्थितीत नागरिकांचे आरोग्य बिघडत आहे’, असे म्हणत कृपया इंधनाच्या रांगेत स्वतःची काळजी घ्या आणि एकमेकांना मदत करा, असे आवाहन महानामा याने तेथील नागरिकांना केले आहे.
महानामाची गणना श्रीलंकेच्या दिग्गज खेळाडूंमध्ये केली जाते. त्याने श्रीलंकेसाठी २१३ एकदिवसीय सामने आणि ५२ कसोटी सामने खेळले आहेत. त्याच्या नावावर कसोटीत ४ शतके आणि ११ अर्धशतके आहेत, तर एकदिवसीय सामन्यांमध्ये ४ शतके आणि ३५ अर्धशतकांसह त्याने ५ हजार १६२ धावा केल्या आहेत. १९९६ मध्ये विश्वचषक स्पर्धेत खेळल्यानंतर १९९९ मध्ये महानामाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती.