कीव – रशिया कोणत्याही क्षणी युक्रेनवर हल्ला चढवण्याची शक्यता आहे. त्यामुळे भारतीयांनी युक्रेन सोडावा, असे आवाहन तेथील भारतीय दूतावासाने केले आहे. विशेषत: विद्यार्थ्यांनी तात्पुरते मायदेशी परतावे, असा सल्ला दूतावासाच्या अधिकाऱ्यांनी दिला आहे.
युक्रेनच्या तिन्ही सीमांवर रशियाने मोठ्या प्रमाणात लष्कर आणि युद्ध सामुग्री तैनात केली आहे. सध्या तेथील परिस्थिती पाहता कोणत्याही क्षणी रशिया युक्रेनवर हल्ला चढवण्याची शक्यता आहे. हा धोका लक्षात घेऊन युक्रेनमधील भारतीयांनी मायदेशी परतावे, असे आवाहन तेथील भारतीय दूतावासाने केले आहे. युक्रेनमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनी सध्याची परिस्थिती लक्षात घेऊन काही दिवस भारतात परतावे. युक्रेनला सहलीसाठी येण्याचे भारतीय पर्यटकांनी टाळावे, असेही दूतावासाने म्हटले आहे. युक्रेनमधील भारतीयांना काही अडचणी असतील तर त्यांनी दूतावासाशी संपर्क साधावा. त्यांना आवश्यक ती मदत केली जाईल, असे त्यांनी सांगितले. सध्या युक्रेनमधील व्यवहार सुरळीत सुरू आहेत. ब्रिटन, अमेरिका आणि इतर देशांनी यापूर्वीच आपल्या नागरिकांना युक्रेन सोडण्याचा सल्ला दिला आहे. त्यानंतर भारतानेही हाच सल्ला दिला आहे.