मुंबई – पत्राचाळ जमिन घोटाळ्याप्रकरणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत यांना ईडीने काल अटक केली असताना गुरुवारी ईडीने संजय राऊतांच्या दोन्ही मुलींच्या वाईन कंपनीत भागीदार असलेल्या सुजित पाटकर यांच्या घरावर अचानक धाड टाकल्याने एकच खळबळ उडाली आहे. या कारवाईमुळे संजय राऊत यांच्या अडचणीत मात्र आता भर पडली आहे.
पाटकर हे संजय राऊतांच्या मुली पुर्वशी आणि विधिता यांच्या मॅगपी डीएफएस प्रा. लि. या वाईनचे वितरण करणार्या कंपनीत सुजित पाटकर हे गेल्या वर्षीपासून भागीदार आहेत. गुरूआशीष कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड ही एचडीआयएल कंपनीची उपकंपनी असून या कंपनीला गोरेगाव पश्चिमेकडील सिद्धार्थनगर येथील पत्रा चाळीच्या पुनर्विकासाचे कंत्राट म्हाडाकडून मिळाले होते. या कामासाठी कंपनीचे संचालक प्रवीण राऊत हे मध्यस्थाचे काम करत होते. परंतु गुरूआशीष कंपनीने हा पुनर्विकास न करता जमिनीवरील एफएसआयची बाजारात 1034 कोटी रुपयांना विक्री केली. प्रवीण राऊतांनी म्हाडातील अधिकार्यांच्या संगनमताने ही विक्री केल्याचे ’ईडी’च्या तपासात समोर आले. त्यानंतर या प्रकरणात ईडीने कारवाई करत प्रवीण राऊतांना बुधवारी अटक केली असतानाच दुसर्या दिवशी गुरुवारी ईडीने कारवाईचा धडाका सुरूच ठेवला. याच या प्रकरणात आता ईडीने सुजित पाटकर यांच्या निवासस्थानी छापे मारले. त्यावेळी त्यांची चौकशीही करण्यात आली.