मुंबई – विधानपरिषद निवडणुकीची धुळीतच शिवसेना आमदार एकनाथ शिंदेंना राज्यात मोठा राजकीय भूकंप केला. जवळपास ३५ आमदारांसोबत बंड करत त्यांनी महाविकास आघाडी सरकारला आव्हान दिलं. अशातच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना ‘जास्तीत जास्त काय होईल सत्ता जाईल आणि काय होईल’, असे वक्तव्य केले. इतकेच नाही, तर त्यांनी ‘महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचा प्रवास विधान सभा बरखास्तीच्या दिशेने..’, असे ट्विट करून महाविकास आघाडी सरकार बरखास्त होणार असे स्पष्ट संकेत दिले आहेत.
महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचा प्रवास विधान सभा बरखास्तीचया दिशेने..
— Sanjay Raut (@rautsanjay61) June 22, 2022
आज सकाळी प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, ‘राज्यपालांना बरं वाटुद्या, मग बघू ना कोणाकडे किती आमदार आहेत. आम्हाला पूर्ण खात्री आहे, विश्वास आहे, एकनाथ शिंदे आणि आमचे सगळे लोक परत स्वगृही परत येतील. कितीही आमदार असुद्या हा आमच्या घरातला विषय आहे. हे सगळे लोक परत आपल्या घरामध्ये येतील. एकनाथ शिंदे असतील किंवा इतर सगळे आमचे सहकारी असतील त्यांचा आणि आमचा चांगला व्यवस्थित संवाद सुरू आहे. आज सकाळीच माझं एकनाथ शिंदेंशी बोलणं झालंय. त्यासंदर्भात मी माननीय उद्धव ठाकरे यांनाही कल्पना दिलेली आहे. एकनाथ शिंदेंशी पक्षाचा संवाद सुरू आहे. ते शिवसैनिक आहेत, बाळासाहेब ठाकऱ्यांपासून ते आतापर्यंत त्यांनी सातत्याने शिवसेनेचंच कार्य केलेलं आहे. आमच्या मनामध्ये कायम एकमेकांविषयी भावना राहिलेल्या आहेत. त्यामुळे तुम्ही असं समजू नका, जर कोणाला आनंदाचं भरतं आलं असेल की, शिवसेनेमध्ये काही होतंय, तर तसं नाहीये जे आहेत बाहेर ते सगळे शिवसैनिक आहेत आणि त्या सगळ्यांना शिवसेनेबरोबरचं राहायचं आहे. काही समज-गैरसमज असतात त्यातून या गोष्टी घडल्या असतील तर त्या दूर होतील. जर भारतीय जनता पक्षाला वाटत असेल की यानिमित्ताने ठाकरे सरकार हे पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे वैगरे कोसळेल, तर शिवसेनेमध्ये राखेतून जन्म घेण्याची ताकद आहे आणि शिवसेनेने अनेकदा राखेतून जन्म घेऊन पुन्हा गरुडझेप घेतलेली आहे. हा गेल्या ५६ वर्षांचा इतिहास आहे. एकनाथ शिंदे आमचे मित्र, आमचे अत्यंत जिवाभावाचे सहकारी आहेत. अनेक वर्ष आम्ही एकत्र काम करतो आहोत. त्यांच्याबरोबर जी आमची चर्चा सुरू आहे ती सकारात्मक आहे. त्यांच्यासाठी पक्ष सोडणं कठीण आहे आणि आमच्यासाठी त्यांना सोडणं कठीण आहे. आज सकाळी आम्ही १ तास बातचीत केली. त्यांच्या काही मागण्या नाही आहेत. त्यांच्या बोलण्यातून हेच दिसतंय की ते शिवसेनेतच राहतील आणि शिवसैनिक म्हणूनच संपूर्ण आयुष्य काढतील. शिवसेना पाठीमागून कारवाया किंवा वार करत नाही. शिवसेना समोरून एखादी गोष्ट करते. शरद पवारांशी आज सकाळीसुद्धा चर्चा झाली, कालही झाली. आज शरद पवार आणि उद्धव ठाकरेसुद्धा भेटतील आणि काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पूर्णपणे उद्धव ठाकरेंच्या पाठीशी उभी आहे. आम्ही संघर्ष करू, शिवसेना हा संघर्ष करणारा पक्ष आहे, लढणारा पक्ष आहे. जास्तीत जास्त काय होईल सत्ता जाईल आणि काय होईल. परंतु पक्षाची प्रतिष्ठा सर्वात वर आहे.’