मुंबई- आजच्या आज दिल्ली एनटीसी होल्डींग कंपनीला मुंबईसह महाराष्ट्रातील गिरणी कामगारांच्या व्यथा लेखी पत्राद्वारे कळविण्यात येतील आणि दिल्लीवरुन येणा-या पैशातून कामगारांचा पगार प्रथम देण्यात येईल,असे आश्वासन मुंबई एनटीसीचे महाप्रबंधक कुणगुमा राजू यांनी आज राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या शिष्टमंडळाला दिले.
त्या अगोदर बंद “गिरण्या सुरु करा, नाहीतर खूर्च्या खाली करा!”, चुकीच्या पद्धतीने काम करणाऱ्या व्यवस्थापनाला शासन झालेच पाहिजे! अशा कामगारांनी घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला. आज मुंबईतील चार गिरण्यांसह बार्शी , अचलपूर येथील एनटीसी गिरण्यातील संतप्त कामगारांनी व्यवस्थानाला घेरावचे आंदोलन छेडले.
मागील गुरुवारी संघटनेचे अध्यक्ष आमदार सचिन अहीर आणि सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांच्या नेतृत्वाखाली मुंबईतील एनटीसी च्या चारी गिरण्यांवर कामगारांनी जोरदार ठिय्या आंदोलन छेडून केंद्र सरकारला जाग आणली होती.पण त्यावर कोणतेही सकारात्मक पाऊल उलण्यात आले नाही.त्यामुळे आज घेराव आंदोलन छेडण्यात आले.
संघटना नेत्यांच्या शिष्टमंडळाने एनटीसीचे नवीन महाप्रबंधक कुणगुमा राजू यांना मागण्यांचे निवेदन दिले.त्या प्रसंगी एनटीसीचे वरिष्ठ डि.के.नासा,जन.मॅनेजर के.सी.पवार आदि उपस्थित होते. खजिनदार निवृत्ती देसाई, उपाध्यक्ष अण्णा शिर्सेकर,सुनिल बोरकर,सेक्रेटरी शिवाजी काळे यांनी व्यवस्थापनाला ठणकावून सांगितले की, मुंबईतून जमीन विक्री अथवा अन्य मार्गाने येणारा पैसा मुंबईतील गिरण्यांच्या विकासावर करावा,न्यायालयातील निर्णया प्रमाणे कामगारांना १००टक्के पगार देण्यात यावा,जमीन विक्रीतून मिळालेल्या कोट्यावधी रुपयातून गिरण्यांचे आधुनिकीकरण करण्यात आले.परंतु त्याही गिरण्या चालविण्यात आल्या नाहीत,हा व्यवस्थापनाचा बेदरकारपणा आहे,असा आरोप करुन शिष्टमंडळाने केंद्र सरकारने एनटीसी गिरण्या त्वरित सुरु केल्या नाहीत किंवा गेल्या पाच महिन्यांचा पगार त्वरीत देण्यात आला नाही,तर संतप्त कामगारांमध्ये उद्रेक होईल,असा इशारा शिष्टमंडळाने शेवटी दिला आहे.