संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 01 July 2022

संत झेवियर्सचा ‘आमोद’२२’ उत्सव लवकरच येतोय…

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

यंदा ९९व्या वर्षात पदार्पण केलेले संत झेवियर्स महाविद्यालयाचे मराठी वांङमय मंडळ हे मुंबई विद्यापीठाच्या अखत्यारीतील सर्वात जुने सांस्कृतिक मंडळ आहे. या महाविद्यालयात वर्षभर अनेक कार्यक्रमांची रेलचेल असते. यातीलच प्रमुख असलेला ‘आमोद’ हा वार्षिक आंतरमहाविद्यालयीन उत्सव यंदा ‘अखंड परंपरा, अतूट वारसा’ या संकल्पनेसह दिनांक ३ ते ५ मार्च दरम्यान रंगणार आहे. विशेष म्हणजे आमोदचे हे सलग नववे वर्ष आहे.

शैक्षणिक वर्ष २१-२२ मधील सर्व कार्यक्रमांचे मंडळाने ऑनलाईन माध्यमांद्वारे आयोजन केले होते. त्यानुसार आमोददेखील ऑनलाईन स्वरूपातच रंगणार आहे. ‘आमोद म्हणजे निव्वळ आनंद, जो पसरवण्याचा आम्ही नेहमीच प्रयत्न असतो’, असे झेवियर्सचे विद्यार्थी म्हणतात.

कला, नाट्य, संगीत, नृत्य, साहित्य अशा सर्व विभागातील स्पर्धांनी यंदाचा आमोद बहुरंगी नटला आहे. एकूण १८ निरनिराळ्या स्पर्धांचे आयोजन या ३ दिवसीय उत्सवात करण्यात आले आहे. महाविद्यालयाकडून दिनांक १३ फेब्रुवारी रोजी ‘ताल – जागर लोककलेचा’ या उद्घाटन पूर्व समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. भारतरत्न दिवंगत लता मंगेशकरजी यांना सुरेल मानवंदना या कार्यक्रमाच्या माध्यमातून देण्यात आली. याप्रसंगी सुप्रसिद्ध संगीतकार, संगीत दिग्दर्शक समीर सप्तिस्कर आणि मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीचे प्रमुख डॉ. गणेश चंदनशिवे यांची प्रमुख उपस्थिती होती. तर विख्यात लोककलावंत कृष्णाई उळेकर यांचीही विशेष उपस्थिती होती. पोवाडा, अभंग, लावणी, कोळीगीत आणि गोंधळ या कार्यक्रमात सादर झाले. प्रणव काफरे आणि मेखला रानडे या विद्यार्थ्यांनी सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अगदी उत्कृष्टरित्या केले.

महत्त्वाचे म्हणजे आता ‘आमोद’२२च्या करंडकावर नाव कोरण्यासाठी इतर महाविद्यालयांमध्ये कडवी चुरस सुरू असून, यंदाचे विजेतेपद कोण पटकावणार हे पाहण्याजोगे असणार आहे. आपल्यालाही ‘आमोद’२२च्या स्पर्धांमध्ये सहभागी व्हायचे असेल, तर खाली दिलेला QR code स्कॅन करा. २२ फेब्रुवारीपर्यंत नोंदणी सुरू आहे. तसेच आमोद’२२ बद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी महाविद्यालयाच्या mvm.xaviers या फेसबुक व इंस्टाग्राम पेजला भेट द्या. दरम्यान, फॉक्सटेल हे आमोदचे प्रमुख प्रायोजक आहेत.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami