संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Saturday, 21 May 2022

संपादकीय : उद्धवजी, कुबड्या टाका; अन्यथा शिवसेनेवर संकट

पाच राज्यांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. भाजपाच्या सीट कमी झाल्या असल्या तरी भाजपाने आपली सर्व राज्ये राखली हे या निकालांतून स्पष्ट झाले आहे. या निकालांचा एकच अर्थ आहे की, जनता मोदी सरकारच्या विरोधात मतदान करण्याच्या तयारीत आहे. पण त्यासाठी त्यांना अत्यंत सक्षम आणि स्वतंत्र बाण्याचा पर्याय दिसायला हवा. ज्या ज्या राज्यात असा पर्याय उदयास आला त्या त्या राज्यात मोदी सरकार अपयशी ठरले. जिथे सक्षम आणि स्वतंत्र पक्ष ताकदवान नाही तिथे भाजपाने बाजी मारली आहे. दोन पक्षांची युती, तीन पक्षांची कडबोळी, 21 पक्षांची ठिगळं पडलेली आघाडी अशी लाचारांची लुडबूड तर जनतेने सातत्याने झिडकारली आहे. लंगड्या घोडीपेक्षा उन्मत्त घोडा परवडला हाच संदेश जनता प्रत्येक निवडणुकीत देत आहे. हा संदेश उद्धव ठाकरे यांनी वेळीच लक्षात घेऊन काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कुबड्या टाकल्या तरच शिवसेनेला भवितव्य आहे, अन्यथा शिवसेना संपेल हे भाकीत अत्यंत दुःखी मनाने करावेच लागेल.

पश्‍चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी वाघिणीसारख्या वार झेलत राहिल्या आणि प्रचंड ताकदीने प्रतिवार करीत राहिल्या. ओडिशात नवीन पटनाईक यांनी आपला किल्ला बंदिस्त ठेवला. आंध्रप्रदेशचे के.सी.राव यांनी एकट्या पक्षाच्या ताकदीवर मोदी सरकारविरुद्ध बंडाचे निशाण फडकवले. दिल्लीत तर अरविंद केजरीवाल यांनी कमाल केली. केंद्र सरकारचा सततचा विरोध आणि सततची आडकाठी असूनही त्यांनी दिल्लीत आपली ताकद तर राखलीच, पण आता पंजाब पूर्ण काबीज केले. या सर्वांना हे यश मिळाले कारण त्यांनी स्थानिक अस्मिता जपल्या. केंद्र आणि राज्य या लढाईत ते स्थानिकांबरोबर उभे राहिले. जे नेते आणि पक्ष आपली पाळेमुळे विसरले ते मोदी सरकारच्या पैशाच्या आणि प्रचाराच्या धबधब्याखाली उन्मळून पडले. आपलं राज्य राखून आपल्या राज्यातून अधिकाधिक खासदार केंद्रात पाठवायचे हाच योग्य मार्ग आहे. मोदी सरकारविरोधात प्रत्येक राज्यातून ताकदीने आलेल्या खासदारांचा ताफा या पद्धतीनेच लोकशाही सशक्त होईल.

काही नेते मोदी सरकारविरुद्ध आघाडी निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यापैकी काहीजण भाजपा नको, काँग्रेस नको, आपण आघाडी करू अशी स्वप्न बघत आहेत. पण अशा आघाड्या कधीही यशस्वी होणार नाहीत. गेल्या लोकसभा निवडणुकीत मोदी सरकारच्या विरोधात एकवीस पक्ष एकत्र आले. भल्यामोठ्या मंचावर या पक्षांचे नेते हातात हात घेऊन उभे राहिले. हे घडत असतानाच व्यासपीठावरच प्रत्येक नेता पुढे येण्याचा प्रयत्न करीत असतानाचे दृश्य सर्वांनी पाहिले आणि भाजपाने बरोबर हाच मुद्दा केला. 21 नेत्यांचा फोटो दाखवित भाजपाने प्रचार केला की, तुम्हाला हे पायातपाय घालणारे कडबोळ्याचे सरकार हवे आहे की मोदींसारखे एक कणखर नेतृत्त्व हवे आहे. या प्रचारानंतर आघाडीचे वाटोळे झाले आणि मोदींचा विजय झाला. 2024 साली पुन्हा अशा आघाडीचा प्रयत्न झाला तर इतिहासाची पुनरावृत्ती होणार आहे.

पण लोकसभेला अजून दोन वर्षे आहेत. महाराष्ट्रात पालिका निवडणुका आहेत, स्थानिक निवडणुका आहेत. या निवडणुका भाजपा मारून नेणार हे आज तरी स्पष्टच दिसत आहे. कारण भाजपाला महाराष्ट्रात विरोधकच राहिलेला नाही. काँग्रेस स्वतःच्याच पायावर धोंडा मारून घेत आहे. पक्षाची अंतर्गत बंडाळी आणि अत्यंत दुबळे नेतृत्त्व त्यामुळे हा पक्ष देशपातळीवर तर संपलाच आहे, पण राज्य पातळीवर नावापुरता राहील. राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष म्हणजे वित्त खाते आहे. त्यांचे बहुसंख्य कार्यकर्ते हृदयाने जोडलेले नाहीत. आर्थिक बाबीने जोडलेले कार्यकर्ते आहेत. जेव्हा ही आर्थिक नाळ कापली जाईल त्या दिवशी हा पक्ष संपेल. भाजपा सध्या हाच कार्यक्रम करीत आहे. सहकार, बँका, कारखाने, शिक्षण संस्था, पतसंस्था, बाजार समित्या ताब्यात घेण्याचा भाजपाने सपाटा लावला आहे. राष्ट्रवादीचे प्रत्येक पायरीवरील आर्थिक जाळे तोडण्यात भाजपा यशस्वी होत आहे. त्यामुळे महाराष्ट्रात जर भाजपाला विरोध करू शकेल असा कोणता पक्ष असेल तर तो मराठी माणसाला साद घालणारा, मराठी माणसाचा स्वाभिमान जपणारा, मराठी माणसाची स्वप्न पूर्ण करू शकणारा, मराठी अस्मिता जपणारा असाच पक्ष असू शकतो. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे यश यातच होते. त्यांनी कायम मराठी मन जपले आणि त्यासाठी कुणाशीही दोन हात करण्याची तयारी ठेवली. आपला नेता आपल्यासाठी कुणालाही भिडतो हे पाहून मराठी माणसाची छाती अभिमानाने फुलत होती. पण दुर्दैवाने आता ते चित्र राहिले नाही. एक मराठी नेता निवडणुकांच्या तोंडावर कार्यालयांची उद्घाटने करीत व्यासपीठावर नक्कला करून करमणूक करतो आहे. दुसरा नेता स्वतःच्या फायद्यासाठी कुणापुढेही झुकतो आहे.

महाराष्ट्रात तीन पक्ष एकत्र येऊन शिवसेनेचे सरकार आले आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तेव्हा मराठी माणूस खूष झाला. तीन पक्षांचे सरकार असले तरी उद्धवजी मुख्यमंत्री आहेत म्हणजे मराठी माणसाचे भलेच होईल असा विश्‍वास जनतेला वाटत होता. पण प्रत्यक्षात उलटेच घडत गेले. ‘ठाकरे सरकार’ सत्तेवर आहे म्हणावे असे काहीच घडले नाही. उलट ‘पवार सरकार’ सत्तेवर आहे असेच जाणवू लागले. उद्धव ठाकरे सर्वांना डावलून कणखरपणे निर्णय घेतात अशी एकही घटना घडली नाही. एसटी कामगार, गोदी कामगार, शिक्षक, वैद्यकीय अधिकारी, सफाई कामगार, बचत गट, गिरणी कामगार, म्हाडा इमारतीतील रहिवासी, पोलीस, महिला बचत गट अशा अनेक ठिकाणी आपली मराठी माणसं आहेत. पण कुणाचेच प्रश्‍न सुटले नाहीत. उलट त्यांच्यावर वरवंटे फिरविण्याचे आदेश निघू लागले. गेले दोन दिवस अवकाळी पावसाने रब्बी पिकंही जमीनदोस्त झाली आहेत, पण विषय कोणते चर्चेत आहेत? ईडी, आयकर, सीबीआय, दिशा सालियान, किरीट सोमय्या, नवाब मलिक, समीर वानखेडे, नाईटलाईफ, बेनामी कंपन्या हे विषय चघळले जात आहेत. किरीट सोमय्या आणि संजय राऊत यांची जुगलबंदी सुरू आहे. सर्व नेते चिखलात लोळले आहेत हे अवघ्या महाराष्ट्राला कळले आहे. त्यामुळे जरा सामान्य माणसांच्या साध्या प्रश्‍नांकडे वळा असे लोक बोलत आहेत. पण तसे घडत नाही आणि तसे घडत नाही म्हणूनच आता शिवसैनिकच उद्धवजींवर संतापू लागले आहेत. महापालिका निवडणुकीवेळी भाजपाला त्यांची मते तर मिळतीलच, पण शिवसेनेवर नाराज शिवसैनिकांचीही मते भाजपाला मिळतील. याचे कारण शिवसैनिक म्हणतात की, आम्ही शिवसेनेला मते देऊन सत्तेवर आणले तरी राष्ट्रवादीच सत्ता चालविणार आहे. मग राष्ट्रवादीला मते देण्यापेक्षा भाजपाला मत देऊ म्हणजे निदान केंद्र सरकारशी ठसन होणार नाही. शिवसैनिकांनी असे म्हणणे हा उध्दव ठाकरेंचा पराभव आहे. हा पराभव आताच गुंजतो आहे. जर यातून सावरायचे असेल तर ‘ठाकरे सरकार’ सत्तेवर आहे हे दाखवून द्यावे लागेल. तीन हातांच्या टाळ्या नको, एकच हात उंचावून आदेश निघाला आणि सर्वांना तो पाळावा लागला ही ताकद दाखवावी लागेल. मराठी माणूस दुखावला आहे, त्याला सावरून त्याच्या हातात विश्‍वासाची मशाल द्यावी लागेल. हे जर घडले नाही तर पालिका आणि लोकसभा दोन्हीकडे पराभव निश्‍चित आहे. हा पराभव नेते पचवतील कारण त्यांनी सात पिढ्यांची कमाई केली आहे, पण हा पराभव शिवसेनेचे कार्यकर्ते जिव्हारी घेतील. कारण मग ‘मायबाप’ म्हणावं असं त्यांच्यासाठी कुणी उरणारच नाही.

Share with :
Facebook
Twitter
Pinterest
LinkedIn
आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami