संपुर्ण जुहूचा मालक ‘रघुनाथराव राणे’ होता

Share on facebook
Facebook
Share on twitter
Twitter
Share on whatsapp
WhatsApp
Share on telegram
Telegram
Share on email
Email
Share on print
Print

‘जुहू’ मुंबईमधली स्वप्ननगरी. पर्यटकांनी भरलेला जुहू बीच आणि डोक्यावरून टोपी खाली पडेल अशा उंच उंच इमारती. इथल्या भेळपुरीपासून ते अमिताभ बच्चनच्या घरापर्यंतच्या अनेक कथा दंतकथा आपण ऐकलेल्या असतात. इथल्या शांत निवांत गल्ल्यांमध्ये मराठी माणसाला घाटी म्हणून हिणवणारे अतिउच्चभ्रू सेलिब्रिटी श्रीमंत लोक राहतात. पण त्यांना काय ठाऊक या सेलिब्रिटींच्या जुहूचा मालक एक माणूस होता. नाव रघुनाथराव राणे.

जुहूचा इतिहास पाहायचा झाला तर कमीत कमी हजार वर्षापूर्वीचे पुरावे सापडतात. बिम्बाख्यान नावाच्या बखरीनुसार ११३८ साली चंपानेरच्या प्रताप बिंब राजाने महिकावती (आजचे केळवे माहीम) हा भाग जिंकून घेतला. त्याने आपला प्रधान बाळकृष्ण सोमवंशीला वाळकेश्वर येथे पाठवले आणि या नव्या भागाचा सर्व्हे करायला सांगितले.

हा बाळकृष्ण सोमवंशी केळवे माहीम, ठाणे, मढ, जुहू, वेसावे (व्हर्सोवा), वहिनाळे आणि अखेर वाळकेश्वर भागात फिरला. हाच जुहूचा पहिला उल्लेख. अगदी शंभर वर्षांपूर्वी पर्यंत जुहू हे एक बेट होतं. अल्लाउद्दिन खिलजीकडून पराभूत झालेला सोरठचा मुरारराज या भागात आला. त्याच्या मुलाने बलदेवराजने बिंबराजाचे राज्य मुंबई भागात प्रस्थापित केले.

१३००च्या शतकात बलदेवराजचा मुलगा म्हणजे हैबतराव राणे. वांद्र्याच्या रन्वार खेड्यात राहू लागला. येथेच त्याने माहेश्वरी देवीचं मंदिर बांधलं. याच हैबतरावाचे वंशज लक्ष्मणराव जुहूला वसले. पुढे दिल्लीच्या सुलतानीच्या काळात लक्ष्मणराव राणेंना जुहू गावाची पाटीलकी मिळाली. त्यांचा वार्षिक पगार होता ५० रुपये.

पुढे मुंबई प्रांतावर पोर्तुगीजांचे राज्य आले. त्यांनी मुंबई इंग्रजांना आंदण म्हणून दिली, परंतु उत्तरेतील भाग मात्र स्वतःच्या हाती ठेवला. त्यांनी जुहूला जुवेम नाव दिले होते. तेथे भंडारी, मीठ व्यापारी शेती करणाऱ्यांच्या छोट्या वसाहती होत्या. जुहूचे रहिवासी प्रामुख्याने कोळी लोक होते. पोर्तुगीजांनी येथे १८५३ साली चर्च ऑफ सेंट जोसेफ हे चर्च बांधले.

असे म्हणतात की या राणेंच्यापैकी कोणीतरी पोर्तुगीजांच्या विरोधात मराठा आरमाराला मदत केली होती. पुन्हा तसे होऊ नये म्हणून पोर्तुगीजांनी त्यांच्या संरक्षणाची ग्वाही दिली आणि हे सुनिश्चित केले की राणे कुटुंब जुहूमध्ये राहील. पण तरीही जेव्हा १७३७ साली पोर्तुगीज आणि मराठा युद्ध सुरू झाले तेव्हा राणेंनी मराठ्यांची बाजू घेतली. पुढच्या दोनच वर्षात चिमाजी अप्पाने वसईचा किल्ला जिंकून पोर्तुगिजांचा पराभव केला आणि साळशेत, ठाणेचा परिसर पेशव्यांच्या अधिपत्याखाली आला. त्यांनी राणेंना जुहूची सनद आणि तिथे नारळाची लागवड करण्याची परवानगी दिली. पुढे हा भाग मराठ्यांकडून इंग्रजांच्या ताब्यात गेला मात्र त्यांनीदेखील राणेंचे जुहूवरचे हक्क मान्य केले.

याच राणेंचे वंशज रघुनाथराव पुतळाजी राणे हे बॉम्बे पोर्ट ट्रस्टचे हेड सर्व्हेअर म्हणून काम पाहत होते. १८६८ साली जुहूमधील जुन्या मुक्तेश्वर मंदिराचे जीर्णोद्धार करत असताना त्यांना मध्ययुगीन पुरावे सापडले. काही वर्षांनी जेव्हा त्यांनी मुक्तेश्वर मंदिराच्या पाठीमागच्या बाजूस ब्रम्हकुंड नावाच्या बंधिस्त कुंडाची निर्मिती करण्यासाठी खड्डा काढला तेव्हा त्यात त्यांना गजलक्ष्मीची मूर्ती सापडली. हिलाच आज शितलादेवी म्हणून पूजले जाते व जुहू बीचजवळ मिळालेल्या मूर्तीला जुहूची ग्रामदेवता म्हणून पूजले जाते. जुहूमध्ये उत्खनन करत असताना एक हाडांचा सांगाडा सापडला ज्याच्या तोंडात एक सोन्याचं नाणं होतं ज्यावर देवनागरी मध्ये ‘रा’ असे कोरलेले आढळले. अशा अनेक गोष्टी राणे कुटुंबाने जपून ठेवल्या होत्या.

रघुनाथ राव राणेंचे सुपुत्र सुप्रसिद्ध चित्रकार कृष्णराव राणेंनी या ऐतिहासिक पुराव्यांचे म्युजियममध्ये रुपांतर केले. पण १९५५ साली आलेल्या चक्रीवादळात या म्युजियमचं प्रचंड नुकसान झालं व ते आता बंद आहे. मात्र आजही इस्कॉन टेम्पलसमोरच्या राणे बंगल्यात यातील अनेक वस्तू आपल्याला पाहता येऊ शकतात.

आज गगनचुंबी इमारतींचे जंगल बनलेलं जुहू १०० वर्षापूर्वीपर्यंत एका छोट्याशा बेटावरील खेड होतं. जमशेदजी टाटांनी १८९०च्या दशकात येथे जमीन खरेदी केली आणि तिथे एक बंगला बांधला. पुढे इथे १२०० एकर जमीन घेऊन रिसोर्ट बांधायचा त्यांचा प्लॅन होता. कालव्यांनी जोडून जुहू बेटाचं व्हेनिसमध्ये रुपांतर करायचं टाटांचं स्वप्न होतं. मात्र दुर्दैवाने त्यांच्या मृत्यूनंतर ही योजना मागे पडली.

१९१९ साली जुहूमध्ये नगरपालिकेची स्थापना झाली. इंग्रजांनी सांताक्रूझ जुहू रस्ता बनवला आणि या भागाला मुंबईशी जोडून टाकले. याच जुहूमध्ये भारतातील पहिले विमानतळ सुरु झाले. मिठाचा सत्याग्रह व इतर आंदोलनातून जुहूनेदेखील स्वातंत्र्यलढ्यात सहभाग घेतला. गांधीजींचे इथे बरेच काळ वास्तव्यदेखील होते.

स्वातंत्र्यानंतरच्या काळात इथे अनेक धनिकांनी, फिल्मस्टारनी जागा घेतली. भारतातील सर्वात महागड्या दराच्या जमिनींमध्ये वरचे स्थान जुहूने पटकावले. मात्र याचबरोबर इथला स्थानिक कोळी हळूहळू आपल्याच हक्काच्या घरातून हद्दपार होत गेला.

Leave a Comment

Your email address will not be published.

Close Bitnami banner
Bitnami