मुंबई- कोरोनाने पुन्हा एकदा महाराष्ट्रात डोके वर काढले आहे. त्यामुळे आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी डॉक्टरांच्या टास्क फोर्सबरोबर बैठक घेऊन सध्याच्या कोरोना स्थितीचा आढावा घेतला आणि मास्क सक्ती नसली तरीही घराबाहेर पडताना जनतेला मास्क वापरण्याचे आवाहन केले आहे. तसेच पुढचे 15 दिवस महत्त्वाचे असल्याचे सांगितले आहे.
गेल्या तीन दिवसांत कोरोना रुग्णांची संख्या वाढलेली आहे. आज राज्यात 1045 नवे रुग्ण सापडले आहेत. कोरोना रुग्ण पुन्हा वाढत असल्याने राज्य सरकारची चिंताही वाढली होती. त्यामुळे आज मुख्यमंत्र्यांनी टास्क फोर्सबरोबर बैठक घेऊन कोरोनाच्या स्थितीचा आढावा घेतला. या बैठकीत टास्क फोर्सचे डॉक्टर तसेच आरोग्य अधिकारी तसेच कोरोनाच्या स्थितीची माहिती मुख्यमंत्र्यांना दिली. त्यानंतर तूर्तास तरी मास्क सक्तीची आवश्यकता नाही, असा निष्कर्ष काढण्यात आला. मात्र खबरदारीचा उपाय म्हणून घराबाहेर पडताना आणि खास करून गर्दीच्या ठिकाणी जाताना मास्क लावावा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे. त्याचबरोबर वयोवृद्ध रुग्णांबाबत अधिक काळजी घेणे गरजेचे आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. पुढील 15 दिवस महत्त्वाचे असून कोरोनाची आकडेवारी पाहून निर्बंधांबाबत निर्णय घेतला जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.