बारामती- राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी आपल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी बारामती दौरा केला. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की,‘राज्याच्या राजकारण जे सुरु आहे. ते दुर्देवी आहे, ज्येष्ठांनी बदला घेतल्याची भाषा वापरणे योग्य नाही, आज अनिल देशमुख, नबाब मलिक यांच्यासोबत जे काही सुरु आहे ते अस्वस्थ करणारे आहे.`
सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या की, यापूर्वीही राजकीय कटुता होती पण सध्या जे सुरु आहे ते मला अस्वस्थ करणारे आहे. देशमुख, मलिक, राऊत या कुटुंबियांना कोणत्या स्थितीतून जावे लागत आहे, याची मला जाणीव आहे. बारामतीत माध्यमांशी बोलताना खासदार सुळे म्हणाल्या, ज्या संस्कृतीत मी वाढले, ती ही संस्कृती नाही. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचा वारसा आपण जपतो. त्यात विरोधक हा वैचारिक विरोध करतो, बदल्याची भाषा त्यात नसते. बदला घेतल्याची भाषा मी पहिल्यांदा ऐकली, हे अतिशय दुदैवी आहे. ज्या पद्धतीने जितेंद्र आव्हाड यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत ते पाहता विरोधकांचे ते पुढील टार्गेट असावेत. महाराष्ट्राने इतके गलिच्छ राजकारण यापूर्वी पाहिले नव्हते, असेही त्या म्हणाल्या.