नाशिक – नाशिक येथील सप्तश्रुंगी देवीच्या दर्शनासाठी आता भाविकांना कर भरावा लागणार आहे. जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सभेत हा प्रस्ताव पारित करण्यात आला आहे. मात्र, हा प्रस्ताव कोणी मांडला, कोणी अनुमोदन दिले याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे या निर्णयामुळे भाविक नाराज झाले आहेत.
नाशिकचे सप्तश्रुंगी मंदिर हे साडेतीन शक्तीपिठांपैकी एक आहे. महाराष्ट्रासह देशभरातील लाखो भाविक येथे दर्शनासाठी येत असतात. या भाविकांना सुविधा पुरवण्यासाठी ग्रामपंचायतीला आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे उत्पन्नाची मर्यादा वाढवण्यासाठी भाविकांच्या वाहनांवर कर लावण्याची मागणी यापूर्वी करण्यात आली होती. तशी चर्चा जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीत झाली. सप्तश्रृंग गड ग्रामपंचायतीने जिल्हा परिषदेकडे त्याबाबत पत्रव्यवहारही केला होता. हे सारे ध्यानात घेता जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांनी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना दरडोई पाच रुपये कर लावण्यासाठी मंजुरी दिल्याचे समजते.
सप्तश्रृंगी देवीच्या दर्शनासाठी एखाद्या वाहनातून पाच जण आले असतील, तर प्रत्येकाकडून पाच रुपये कर म्हणजे एकूण 25 रुपये वसूल केले जातील. प्रत्येक भाविकाला पावती द्यावी लागेल. मात्र, या दरडोई पाच रुपयांच्या कराबद्दल भाविकांमध्ये नाराजी आहे. सप्तश्रृंगी गड हे महाराष्ट्रातील मोठे दैवत. इथे लाखो लोक येतात. ते देवीला सढळ हस्ते दानही करतात. त्यानंतरही अव्वाच्यासव्वा कर आकारणी करण्यात आल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे या कर प्रस्तावाला विरोधाची शक्यता गृहीत धरून तो गुपचूपपणे जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सभेत घुसवण्यात आला आणि मंजूर करण्यात आल्याचे समजते. त्यावरून आत्ताच ठिणग्या पडायला सुरुवात झाली आहे. येणाऱ्या काळात हा विरोध वाढू शकतो.