लखनऊ- समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी मैनपुरी करहल विधानसभा मतदारसंघातून सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्जासोबत त्यांनी संपत्तीचे विवरण दिले आहे. त्यानुसार अखिलेश यादव, त्यांची पत्नी आणि मुलांची एकूण मालमत्ता 40 कोटी आहे. विशेष म्हणजे अखिलेश यादव यांच्यावरही कर्ज आहे. त्यांनी पत्नी डिंपल यादवकडून 8 लाख 15 हजारांचे कर्ज घेतले आहे. त्याची नोंद त्यांच्या शपथपत्रात आहे.
अखिलेश यादव यांची एकूण जंगम मालमत्ता 8 कोटी 43 लाख रुपयांची आहे. त्यांची पत्नी डिंपलची 4 कोटी 76 लाखांची आहे. अखिलेश यादव यांच्याकडे 17.22 कोटींची स्थावर मालमत्ता आहे. तर पत्नी डिंपलजवळ 9.61 कोटींची स्थावर मालमत्ता आहे. अखिलेश यादव यांच्यावर 28 लाख 97 हजारांचे कर्ज आहे. त्यपैकी अखिलेश यादव यांनी पत्नी डिंपलकडून 8 लाख 15 हजारांचे कर्ज घेतले आहे. त्यांच्या पत्नीवर 14 लाख 26 हजारांचे कर्ज आहे. डिंपल यादवकडे 59 लाख 76 हजारांचे दागिने आहेत. अखिलेश यादव यांच्याकडे 1.80 लाख तर त्यांच्या पत्नीकडे 3.32 लाखांची रोकड आहे. 2016-17 मध्ये त्यांचे उत्पन्न 71 लाख 66 हजार 998 रुपये होते. 2020-21 मध्ये त्यात वाढ होऊन ते 93 लाख 98 हजार 569 रुपये झाले. मुलगी आदिती व टीना आणि मुलगा अर्जुन त्यांचे वारसदार आहेत.