संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 01 July 2022

समीर वानखेडे यांची पोलिसांकडून आठ तास चौकशी

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई – नवी मुंबईतील हॉटेलमध्ये मद्य विक्रीच्या परवान्यासाठी बनावट कागदपत्रे सादर करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी), मुंबईचे माजी संचालक समीर वानखेडे यांची कोपरी पोलिसांनी बुधवारी सलग आठ तास चौकशी केली. वानखेडे यांच्यावर याबाबत आरोप करणारे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांची मुंबईतील ईडी कार्यालयात अशीच आठ तास चौकशी सुरू असताना वानखेडे हेदेखील ठाण्यात पोलिसांच्या प्रश्नांना सामोरे जात होते. रात्री 8.15च्या सुमारास ते पोलीस ठाण्यातून बाहेर आले आणि आपण तपासात पोलिसांना संपूर्ण सहकार्य करणार असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली. मात्र याव्यतिरिक्त अधिक बोलण्यास स्पष्ट नकार दिला.

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नवी मुंबई विभागाने वानखेडे यांच्याविरुद्ध कोपरी पोलीस ठाण्यात १९ फेब्रुवारी रोजी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. याच संदर्भात त्यांना बुधवारी हजर राहण्याची नोटीस कोपरी पोलिसांनी बजावली होती. त्या पार्श्वभूमीवर आपल्या वकिलांसह बुधवारी सकाळी वानखेडे कोपरी पोलिसांसमोर हजर झाले. तपास अधिकारी पोलीस निरीक्षक दिलीप फुलपगारे हे यावेळी कामानिमित्त बाहेर असल्यामुळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ममता डिसुझा यांनी त्यांना साडेअकरा वाजता पोलीस ठाण्यात पाचारण केले. त्यानंतर तब्बल नऊ तासांच्या चौकशीनंतर ते पोलीस ठाण्यातून बाहेर आले.

वानखेडे म्हणाले की, ‘हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने यावर किंवा नोंदवलेल्या जबाबावर मी भाष्य करू शकत नाही. मात्र पोलीस त्यांचे काम करत असून या प्रकरणी मला जेव्हाही बोलावले जाईल तेव्हा मी त्यांना सहकार्य करेन.’ तसेच राज्याचे कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांना ईडीने केलेल्या अटकेवर त्यांनी कोणतेही प्रश्न विचारण्यास नकार दिला. दरम्यान, समीर वानखेडे यांच्यावर खोट्या माहितीच्या आधारे मद्यविक्री परवाना मिळवला असल्याचा आरोप लावण्यात आला आहे. ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी काही दिवसांपूर्वीच त्यांच्या बारचा परवाना रद्द केला होता. तसेच वानखेडे यांच्याविरोधात उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी शंकर गोगावले यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार नवी मुंबई, वाशी येथून गुन्हा वर्ग केल्यानंतर कोपरी पोलीस ठाण्यात कलम 420 प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami