नवी दिल्ली – मागील काही वर्षापासुन आर्थिक अडचणींचा सामना करत असलेली सरकारी दूरसंचार कंपनी भारत संचार निगम लिमिटेड म्हणजेच बीएसएनएल आता किती तोट्यात आहे याबाबत केंद्र सरकारनेच माहिती दिली आहे.या कंपनीचा ३१ मार्च २०२२ पर्यंतचा निव्वळ तोटा ५७,६७१ कोटी इतका आहे तर एमटीएनएलचा तोटा १४,८०८ कोटी रुपये इतका आहे, अशी माहिती केंद्रीय दळणवळण राज्यमंत्री देवूसिंह चौहान यांनी राज्यसभेत दिली आहे.
एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात दळणवळण राज्यमंत्री चौहान यांनी सांगितले की, या दोन्ही कंपन्या प्रामुख्याने कर्जाचा बोजा,कर्मचार्यांचा खर्च बाजारपेठेतील तीव्र स्पर्धा आणि ४ जी सेवेचा अभाव यामुळे तोट्यात आहेत.बीएसएनएलला व्यवहार्य सार्वजनीक क्षेत्रातील उपक्रमात रुपांतरीत करण्यासाठी सरकारने यावर्षी २७ जुलैला बीएसएनएलसाठी १.६४ लाख कोटी रुपयांचे पुनरुज्जीवन पॅकेज मंजूर केले आहे. त्यानुसार भारत ब्रॉडबँड निगम लिमिटेडचे बीएसएनएलमध्ये विलिनीकरण केले जाणार आहे.तसेच बीएसएनएलला भारतीय ४ जी स्टॅक तैनात करण्याचे निर्देश देण्यात आले आहे.या कंपनीच्या १ लाख ४ जी साईट्स आवश्यकतेसाठी ऑक्टोबर २०२२ मध्ये निविदा काढली आहे.