सोलापूर – दुसऱ्या टप्प्यातील नवीन लाल कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणात झाल्याने आता हा कांदा राज्यातील सर्व बाजार समिती आवारात दाखल झाला आहे. हा नवीन लाल कांदा प्रचंड स्वरुपात आढळून येत असल्याने घाऊक आणि घाऊक बाजारातील दर घसरले आहेत.त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे आता केंद्र शासनाने कांदा निर्यातीबाबत ठोस धोरण करण्याची मागणी जोर धरत आहे.
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा उन्हाळ कांद्याची लागवड २५ ते ३० टक्क्यांनी वाढली आहे. सोलापूर बाजार समिती आवारात तर एका दिवसात १२०० ट्रक एव्हढी उच्चांकी आवक झाली आहे. सध्या दहा किलो कांद्याला प्रतवारीनुसार २०० ते २३० रुपये असे दर आहेत. नवी मुंबई बाजार समितीच्या आवारातही मागणीच्या तुलनेत या कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक होत असल्याचे या बाजार समितीकडून सांगण्यात आले. दर स्थिर ठेवण्यासाठी कांदा निर्यातीला चालना देण्याची गरज असल्याचे नाफेड चे माजी उपाध्यक्ष चांगदेवराव होळकर यांनी म्हटले आहे.
नाशिक भागातील कांद्याची चव ही इराण, अफगाणिस्तान या देशांच्या तुलनेत वेगळी आहे. इतरांपेक्षा आपला हा कांदा महाग असतो. श्रीलंका आणि आखाती देशातून भारताच्या कांद्याला चांगली मागणी असते. पण निर्यातीसाठी केंद्र शासनाकडून अनुदान देत नाही. किमान देशांतर्गत वाहतुकीसाठी तरी सरकारने मदत केली पाहिजे अशी अपेक्षा चांगदेवराव होळकर यांनी व्यक्त केली आहे.