मुंबई – ऑनलाइन गेमिंग गुंतवणूक, खंडणी आणि ठार मारण्याची धमकी देणाऱ्या ५ तरुणांना मुंबई उच्च न्यायालयाने अनोखी शिक्षा सुनावली आहे. त्यांना ६ महिने वृद्धाश्रमात जाऊन तेथे सेवा करण्याची शिक्षा सुनावली आहे. त्याचे प्रमाणपत्र त्यांना न्यायालयात सादर करावे लागणार आहे. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती प्रसन्न वराळे आणि न्यायमूर्ती अनिल किल्लोर यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला.
ऑनलाइन गेमिंग गुंतवणूक, फसवणूक, खंडणी आणि धमकी प्रकरणात नोकरी गेली. याशिवाय पुढे नोकरी मिळण्यात अडचणी येणार आहेत. त्यामुळे हा गुन्हा रद्द करावा, अशा मागणीच्या विनंतीची याचिका यात आरोप असलेल्या ५ तरुणांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली होती. या प्रकरणात तक्रारदारही सामंजस्याने प्रकरण मिटवण्यास तयार आहे. तसे त्याने सांगितले असल्याचे पोलिसांच्या वतीने न्यायालयात सांगण्यात आले. त्यानंतर न्यायालयाने या ५ तरुणांना ६ महिने वृद्धाश्रमात सेवा करण्याची शिक्षा सुनावली. महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या शनिवारी सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत पुण्याच्या ‘निवार’ वृद्धाश्रमात सेवा करावी. तेथे काम केल्याचे ६ महिन्यांचे प्रमाणपत्र सादर करावे, असा आदेश हायकोर्टाने दिला. या प्रकरणात तक्रारदारालाही हीच शिक्षा सुनावली आहे. त्यालाही वृद्धाश्रमात सेवा करावी लागणार आहे.