नाशिक – नाशिक जिल्ह्यातील सातपूर औद्योगिक वसाहतीतील निलराज कारखान्याला आज पहाटे पाचच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत पहिला मजला जळून खाक झाला असून त्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून, सुदैवाने कुठलीही जीवित हानी झाली नाही. आग लागल्याचे समजताच महापालिकेच्या अग्निशमन दलास संपर्क साधण्यात आला. त्यानंतर अग्निशमन दलाचे ३ बंब, एमआयडीसीचा १ बंब, महिंद्रा आणि महिंद्रा कंपनीचा १ बंबासह इतरही बंब घटनास्थळी दाखल झाले. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांसह एकूण २५ जणांनी मिळून ही आग विझवली.
दरम्यान, सातपूर एमआयडीसीतील प्लॉट नंबर ३४ ए निलराज इंजीनियरिंग या कंपनीच्या पहिल्या मजल्यावर कॅपॅसिटरसाठी लागणारे ॲल्युमिनियम कॅपच्या गोदामाला लागलेल्या या आगीत ॲल्युमिनियम कॅप व खोके जळून खाक झाले. ही आग शॉर्टसर्कीटमुळे लागली की आणखी कशामुळे याचा शोध सुरू आहे. मात्र, आगीत जीवितहानी झाली नाही. पहाटे लागलेली आग सकाळी बराच वेळ भडकत होती.
साधरणतः दहा वाजेपर्यंत आग विझवण्याचे काम सुरू होते. ही घटना कंपनीतील कामगार असताना घडली असती, तर मोठा अनर्थ ओढावला असता. घटनास्थळी महापालिकेच्या अग्निशमन केंद्राचे प्रमुख राजेंद्र बैरागी, पी. जी. परदेशी, आर. ए. लाड आदी उपस्थित होते.