मुंबई – मुंबईच्या पूर्व उपनगराच्या घाटकोपर ‘एन’ विभागातील विद्याविहार येथे महापालिका सोमय्या नाल्याखालून सूक्ष्म बोगदा पद्धतीने जलवाहिन्या वळवण्याचे पहिल्या टप्प्यातील काम बुधवारी १८ मे रोजी सकाळी १० पासून हाती घेणार आहे. हे काम गुरुवारी १९ मे २०२२ रोजी सकाळी १० वाजेपर्यंत चालणार आहे. त्यामुळे मुंबई उपनगरातील कुर्ला, सायन, चेंबूर, घाटकोपर, माटुंगा आदी भागातील पाणीपुरवठा २४ तास बंद राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा पुरेसा साठा करून काटकसरीने वापर करावा, असे आवाहन पालिकेने नागरिकांना केले आहे.
मुंबई महापालिका सोमय्या नाल्याखालून मायक्रोटनेलिंग पद्धतीने जलवाहिन्या वळवण्याचे काम करणार आहे. त्यामुळे मुंबईच्या उपनगरात काही ठिकाणचा पाणीपुरवठा २४ तास बंद राहणार आहे. काही ठिकाणी कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. या कामामुळे राहुल नगर, एडवर्ड नगर, नेहरू नगर, जागृती नगर, शिवसृष्टी, चुनाभट्टी, पंम्पिंग स्वदेशी मिल मार्ग, घाटकोपरमधील राजावाडी, आंबेडकर नगर, विद्याविहार स्टेशन, सहकार नगर, आदर्श नगर, वडाळा ट्रक टर्मिनल, वडाळा मोनोरेल डेपो येथील पाणीपुरवठा २४ तास बंद राहणार असून परळ, लालबाग या भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे, असे पालिकेने पत्रकात म्हटले आहे.