सावंतवाडी – तालुक्यातील मळेवाड पुलाजवळच्या नदीपात्रात पुन्हा एकदा मगरीचे दर्शन झाल्याने स्थानिक नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. या परिसरातील मुरकरवाडी येथील विश्वास चराटकर, विनय जाधव, अतुल मुरकर आणि स्वप्नाली जाधव या ग्रामस्थांना या नदीपात्रात ही मगर दिसली. ही मगर बराच वेळ नदीपात्रात फिरत होती. मात्र काही वेळाने ही मगर दिसेनाशी झाली.
सध्या पावसाळा सुरू झाल्याने अनेक शेतकरी शेतीच्या कामामध्ये गर्क आहेत. या लोकांची शेती या नदीपात्राच्या बाजूलाच असल्याने लोकांची या नदी पात्रालगत सतत ये-जा असते. त्यातच मुरकरवाडी आणि चराटवाडी येथील ग्रामस्थांना या नदीपात्रात मगर दिसल्याने सध्या सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे. याधीही या नदीपात्रात लोकांना मगरी दिसल्या आहेत. मात्र यंदा प्रथमच पावसाळा सुरू होताच मगरीने दर्शन दिले आहे. त्यामुळे वनविभागाने याची दखल घेऊन या मगरीचा योग्य तो बंदोबस्त करावा, अशी मागणी मळेवाड परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे.