सिंधुदुर्ग – पावसाळा सुरू होताच सिंधुदुर्ग जिल्ह्यात साथीच्या आजारांनी डोके वर काढण्यास सुरुवात केली आहे. त्यात डेंग्यूने थैमान घातले आहे. जानेवारीपासून आतापर्यंत जिल्ह्यात १२३ डेंग्यूचे रुग्ण सापडले. त्यापैकी जूनमध्ये २३ तर जुलैमध्ये ६३ रुग्ण सापडले आहेत. खबरदारी म्हणून नागरिकांनी योग्य काळजी घ्यावी आणि घराशेजारी पाणी साचू देऊ नये, असे आवाहन जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. रमेश कर्तस्कर यांनी केले.
सिंधुदुर्गमध्ये या वर्षात आतापर्यंत डेंग्यूचे १२३ तर हिवतापाचे १८ रुग्ण सापडले आहेत. मेमध्ये ३७, जूनमध्ये २३ आणि जुलैमध्ये ६३ डेंग्यूचे रुग्ण सापडले. त्यामुळे जिल्ह्याच्या आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे. डेंग्यूचा वाढता प्रादुर्भाव टाळण्यासाठी नागरिकांनी घराशेजारी पाणी साचू देऊ नये. ताप आल्यास सरकारी रुग्णालयात उपचार घ्यावेत, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. खबरदारी म्हणून औषध फवारणी आणि डास निर्मूलन उपाययोजना हाती घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत.