पुणे – पुण्याच्या सिंहगड परिसरात पट्टेरी वाघ दिसल्याची तक्रार पर्यटकांनी केल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये खळबळ माजली आहे. सिंहगड घाट रस्त्यावरील कोंढणपूर फाट्याजवळ गुरुवारी सायंकाळी वाघ दिसल्याची तक्रार काही पर्यटकांनी पोलिस आणि वन विभागाकडे केली. तथापि पर्यटकांना दिसलेला वन्यप्राणी बिबट्या किंवा तरस असू शकतो, असा प्राथमिक अंदाज वन विभागाने वर्तवला आहे. या घटनेनंतर गुरुवारी रात्री उशिरापर्यंत परिसरात शोध मोहीम राबवली. मात्र त्यांच्या हाती काहीच लागलेले नाही.
काही पर्यटक गुरुवारी सिंहगडला फिरायला गेले होते. सायंकाळी ते परतत असताना वारजे येथील प्रवीण आणि पूजा या पर्यटकांना कोंढणपूर फाट्याजवळ वन्यप्राणी रस्ता ओलांडताना दिसला. तो पट्टेरी वाघासारखा होता. म्हणून त्यांनी आरडाओरडा केला. मात्र तो जंगलात पळून गेला. याची माहिती त्यांनी पोलिस आणि वन अधिकाऱ्यांना दिली. त्यानंतर त्यांनी या परिसरात शोध घेतला. परंतु त्यांना काहीच आढळले नाही. या पर्यटकांनी पाहिलेला वन्यप्राणी बिबट्या किंवा तरस असू शकतो, असे त्यांनी सांगितले.