नवी दिल्ली- दिल्लीच्या कथित आबकारी धोरण घोटाळ्यातील प्रमुख आरोपी आणि दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना सीबीआयने नोटीस बजावली आहे. या प्रकरणात उद्या सोमवारी सकाळी ११ वाजता मुख्य कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे. त्यावर “मी उद्या सीबीआय चौकशीला सामोरे जाणार आहे. त्यांना संपूर्ण सहकार्य करणार आहे. सत्यमेव जयते।’, असे ट्विट सिसोदिया यांनी केले आहे.
दिल्लीतील अरविंद केजरीवाल सरकारच्या दारू धोरण घोटाळ्याची सीबीआय आणि ईडी चौकशी करत आहे. या प्रकरणात सीबीआयने मुख्य आरोपी आणि आपचे नेते उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना नोटीस बजावली आहे. त्यांना उद्या सकाळी ११ वाजता दिल्लीतील सीबीआयच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे. त्यावर सीबीआयची नोटिस मला मिळाली आहे. त्यांनी माझ्या घरावर छापा घालून १४ तास झडती घेतली. पण त्यांना काहीच मिळाले नाही. माझे बँक लॉकर तपासले. त्यात त्यांना काही मिळाले नाही. माझ्या गावात तपास केला. तेथेही त्यांना काही सापडले नाही. आता उद्या सकाळी ११ वाजता त्यांनी मला चौकशीसाठी मुख्य कार्यालयात बोलवले आहे. तेथे मी जाणार. त्यांना संपूर्ण सहकार्य करणार. सत्यमेव जयते, असे ट्विट मनीष सिसोदिया यांनी केले आहे. या प्रकरणात सिसोदिया यांना केंद्रीय यंत्रणा अटक करू शकतात, अशी भीती आम आदमी पार्टीचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी यापूर्वी अनेकदा व्यक्त केली आहे. केंद्र सरकार केंद्रीय तपास यंत्रणांचा दुरुपयोग करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.