नवी दिल्ली – मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचा पुनर्विकास केला जाणार आहे. त्याचे काम येत्या ५ महिन्यांत सुरू करण्यात येणार आहे. केंद्र सरकारने सीएसएमटीसह अन्य रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकास कामासाठी १० हजार कोटींचा निधी मंजूर केला आहे. त्यानुसार निविदा काढून हे काम सुरू होणार आहे, अशी माहिती रेल्वे मंत्रालयाने दिली.
मुंबईतील सीएसएमटीसह देशातील १४ प्रमुख रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्यासाठी सप्टेंबरमध्ये झालेल्या बैठकीत अहमदाबाद, नवी दिल्ली आणि सीएसएमटीसह अन्य स्थानकांच्या पुनर्विकासासाठी १० हजार कोटींच्या निधीला सरकारने मंजुरी दिली. या कामाच्या आता निविदा काढल्या जाणार आहेत. खासगीकरणाच्या सहकार्यातून रेल्वे स्थानकांचा हा पुनर्विकास केला जाणार आहे. त्यात रेल्वेची ४० टक्के आणि खासगी कंपन्यांची ६० टक्के गुंतवणूक असणार आहे. रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासाचा फायदा रोजगार आणि उत्पन्नात वाढीसाठी होणार आहे. या रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासासाठी लवकरच निविदा काढल्या जाणार आहेत. त्यानंतर त्यांच्या पुनर्विकासाचे काम सुरू होणार आहे. फूड कोर्ट, रूफ प्लाझा, प्रतीक्षालय, मुलांना खेळण्यासाठी जागा आदी सुविधा पुनर्विकासानंतर प्रवाशांना मिळणार आहेत. मेट्रो आणि बस वाहतूक रेल्वे स्थानकाला जोडली जाणार आहे. अपंगांसाठी पायाभूत सुविधांचा त्यात समावेश आहे. ऊर्जा बचतीचाही अवलंब केला जाणार आहे. प्रवाशांना चांगल्या सुविधा देण्यावर भर दिला जाणार आहे, असे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.