डमस्कस- इस्तंबूलमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तुर्कीने बदला घेतला. उत्तर सीरिया आणि उत्तर इराकच्या खुर्द दहशतवादी तळांवर हवाई हल्ले केले. सीरियातील अनेक शहरांवर तुर्कीने हवाई हल्ले चढवले. त्यात लष्कराचे १२ जवान ठार झाले असून अनेक जण जखमी झाले आहेत. हवाई हल्ल्यात खुर्द अतिरेक्यांचे तळ उध्वस्त केले, अशी माहिती तुर्कीच्या संरक्षण मंत्रालयाने दिली.
तुर्कीच्या इस्तंबूलमध्ये १३ नोव्हेंबरला दुपारी ४.१५ च्या सुमारास बॉम्बस्फोट झाला होता. त्यात ६ जण ठार झाले. तर ८१ जण जखमी झाले. कुर्दिस्थान वर्कर्स पार्टी आणि सीरियन कुर्दिश वायपीजी मिलिशिया या संघटनेने हा हल्ला केल्याचा आरोप तुर्कीच्या सरकारने केला होता. त्याचा बदला म्हणून तुर्कीने शनिवारी उत्तर सीरिया आणि उत्तर इराकमधील खुर्द दहशतवाद्यांच्या तळावर हवाई हल्ले चढवले. अल-बेलोनिया आणि दाहील-अल-अरब या गावांमध्ये तुर्कीने हवाई हल्ले चढवले. त्यात जीवित हानी झाल्याचे वृत्त नाही. दहशतवादी लपून बसलेल्या ठिकाणी दोन स्फोट झाल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. सीरियातील शहरांवर तुर्कीने चढवलेल्या हल्ल्यात १२ सैनिक ठार झाले आहेत. तर अनेक जण जखमी झाले आहेत. इस्तंबूलमधील दहशतवादी हल्ल्याचा बदला म्हणून तुर्कीने ही कारवाई केली.