संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Monday, 04 July 2022

सुपरमार्केटमध्ये वाईन विक्रीच्या विरोधात अण्णांचे १४ फेब्रुवारीपासून उपोषण

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

अहमदनगर – सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीला परवानगी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्याला अनेकांचा विरोध आहे. विरोधी पक्षानेही यावरून महाविकास आघाडीवर टीका केली आहे. सरकारच्या या निर्णयाविरोधात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनीही संताप व्यक्त केला आहे. किराणा दुकानातून वाईन विक्रीला परवानगी देण्यास त्यांचा विरोध आहे. त्याच्या विरोधात १४ फेब्रुवारी २०२२ पासून आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवलेल्या पत्रात दिला आहे. राळेगणसिद्धी येथील यादवबाबा मंदिरात आपण आमरण उपोषण सुरू करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

राज्य सरकारने वाईन विक्री संदर्भात काही दिवसांपूर्वी धोरणात्मक निर्णय घेतला आहे. त्यानुसार सुपरमार्केट आणि किराणा दुकानांमधून वाईन विक्री होणार आहे. हे अतिशय दुर्दैवी आहे. राज्याचा महसूल, वाईन उत्पादक आणि विक्रेते यांचे हित लक्षात घेऊन हा निर्णय घेतल्याचे दिसते. मात्र यामुळे लहान मुले आणि तरुण व्यसनाधीन होऊ शकतात. महिलांना त्रास होऊ शकतो. याचा सरकारने विचार केलेला दिसत नाही त्याची खंत वाटते. युवाशक्ती ही आमची राष्ट्रशक्ती आहे. ती बरबाद करू पाहणाऱ्या निर्णयाला विरोध करण्याशिवाय पर्याय नाही. वाईन ही दारु नाही, असा दुर्दैवी युक्तिवाद सरकार करते ते आश्‍चर्यकारक आहे. सरकारच्या या निर्णयाला विविध क्षेत्रांतून विरोध होत आहे. राज्याच्या ३६ जिल्ह्यांमध्ये भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन संघटन आहे. तेथील कार्यकर्त्यांनी निवेदन पाठवून विरोध केला आहे.

अनेक बिगर शासकीय संस्थांनीही विरोध केला आहे. त्यानंतरही सरकारला जाग येत नसेल तर आंदोलनाशिवाय पर्याय नाही. राज्यातील विविध सामाजिक संघटना आणि समविचारी कार्यकर्त्यांची राळेगणसिद्धीत बैठक घेतली जाणार आहे. त्यात आंदोलनाची दिशा ठरविण्यात येईल. सरकारने हा निर्णय तात्काळ रद्द करावा, अशी जनतेची मागणी आहे. सरकारने तो मागे घेतला नाही तर मला १४ फेब्रुवारीपासून यादवबाबा मंदिरात आमरण उपोषण सुरू करावे लागेल, असा इशारा त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्रात दिला आहे.

लहान मुले आमची राष्ट्रीय संपत्ती आहे. बालकांमध्ये उद्याचे महापुरुष आहेत. सुपरमार्केट आणि किराणा दुकानांमध्ये वाईन ठेवली तर ही बालकेसुद्धा व्यसनाधीन होतील. ती अधोगतीकडे जातील. आमच्या संस्कृतीचे जतन व्हावे म्हणून साधुसंत, राष्ट्रीय महापुरुष यांनी अतोनात प्रयत्न केले. संस्कृती जतन करून ती वाढवण्याचा प्रयत्न केला. मात्र दुकानात वाईन आली तर आमची संस्कृती धुळीला मिळेल. चंगळवादी, भोगवादी संस्कृती वाढीला लागेल. त्यातून काय अनर्थ घडेल ते सांगता येत नाही. अधोगतीकडे नेणारी संस्कृती नको म्हणून आपण उपोषणाचा निर्णय घेतला, असे अण्णा हजारे यांनी पत्रात म्हटले आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami