न्यूयॉर्क- संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत कायमस्वरूपी सदस्यत्व मिळावे, यासाठी ब्रिटननंतर आता फ्रान्सनेही भारताला पाठिंबा दिला आहे. भारताबरोबरच जर्मनी, जपान आणि ब्राझीललाही सदस्यत्व मिळाले पाहिजे, अशी भूमिका ब्रिटन आणि फ्रान्सने घेतली आहे.
संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या सुधारणांवर वार्षिक चर्चा सुरू झाली आहे. या चर्चेत फ्रान्सचे प्रतिनिधी नॅथली ब्रॉडहर्स्ट एस्टिव्हल यांनी सुरक्षा परिषदेत कायमस्वरूपी सदस्य म्हणून भारत, जर्मनी, ब्राझील आणि जपानला आम्ही पाठिंबा देतो. त्यांचे जाहीर समर्थन करतो, असे सांगितले. यापूर्वी संयुक्त राष्ट्र परिषदेच्या कायमस्वरूपी सदस्यत्वासाठी ब्रिटननेही भारताला पाठिंबा दिला होता. त्यानंतर फ्रान्सनेही हीच भूमिका घेतली आहे. आम्हाला कायमस्वरूपी सदस्यत्वासाठी आफ्रिकन देशांचे अधिक प्रतिनिधित्व हवे आहे. कारण भौगोलिक प्रतिनिधित्व सुनिश्चित करण्यासाठी अनेक जागा वितरित केल्या पाहिजेत, असे ते म्हणाले. व्हेटोचा मुद्दा संवेदनशील आहे. भारत, जर्मनी, जपान आणि ब्राझीलसाठी परिषदेत कायमस्वरूपी जागा निर्माण करण्यास व त्यांना कायमचे प्रतिनिधित्व देण्यास आम्ही समर्थन देतो, असे ब्रिटनच्या राजदूत बार्बरा वुडवर्ड यांनी सांगितले.