कल्याण:- सुषमा अंधारे यांनी हिंदू देवी-देवता तसेच साधू संतांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. याच पार्श्वभूमीवर हिंदुत्ववादी संघटना, शिंदे गटाच्या बाळासाहेबांची शिवसेनेने ठाणे, कल्याण, डोंबिवली बंदची हाक दिली होती. मात्र या बंदला नागरिकांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे.
दरम्यान डोंबिवली कल्याण शहरातील सर्व व्यवहार नियमितपणे सुरू होते. रिक्षा बस वाहतूक सुरळीत सुरु होती. बाजारपेठा नेहमीप्रमाणे उघडण्यात आल्या होत्या. डोंबिवलीतील लालबावटा रिक्षा संघटनेने आम्ही या बंदमध्ये सामील होणार नाही असे जाहीर केले.ज्यांना या बंदमध्ये सामील व्हायचे आहे त्यांनीच सामील व्हावे. कोणावर सक्ती केली जाणार नाही असे बाळासाहेबांची शिवसेना पक्षातर्फे जाहीर करण्यात आले.
या बंदमध्ये बजरंग दल, सर्व हिंदुत्ववादी संघटना, ज्वेलर्स संघटना, रिक्षा संघटना सहभागी झाल्या. वारकरी संप्रदायाच्या मंडळींनी अंधारे यांच्या वक्तव्यांचा निषेध केला आहे. ठाण्यात बस आणि रिक्षाही काही वेळासाठी बंद ठेवण्यात आल्या होत्या. डोंबिवलीतील चार रस्त्याजवळ बजरंग दलाने सुषमा अंधारे यांच्या विरोधात घोषणा दिल्या होत्या.