संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 03 February 2023

सूर्यग्रहणामुळे देशातील अनेक मंदिरे बंद
शेगावमध्ये भक्तांनी जाळीतून दर्शन घेतले

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई – भारतामधील अनेक शहरांमधून या वर्षातले आजचे शेवटचे ग्रहण पाहता आले. हे 2022 मधील पहिले सूर्यग्रहण होते जे भारतामध्ये पाहायला मिळाले आहे. सूर्यग्रहणामुळे आज राज्यातील काही मंदिरे बंद करण्यात आली होती तर काही ठिकाणी दुरून दर्शन घेता आले. काही मंदिरात ग्रहण काळात भाविकांना दर्शनाला परवानगी नव्हती. आज संध्याकाळी 4.48 मिनिटांनी सूर्यग्रहण सुरू होऊन हे ग्रहण 5.59 मिनिटांनी संपले. आज ग्रहणादरम्यान शेगावातील संत गजानन महाराजांचे मंदिर खुले होते. मात्र भाविकांना जाळीतूनच दर्शन घ्यावे लागले. आज सकाळी 3 वाजून 30 मिनिटांनी ग्रहणाचे वेध लागले असल्याने पहाटेची काकड आरती झाली नाही व दुपारची पूजा, षोडशोपचार पूजा आणि मध्यान्हांची आरती झाली नाही असे संत गजानन महाराज संस्थानाच्या वतीने सांगण्यात आले. दिवाळी नंतर सलग सुट्या असल्याने भाविकांची गर्दी लक्षात घेता मंदिरात मोठी उपाययोजना करण्यात आल्या होत्या.

सिद्धीविनायक मंदिरात संध्याकाळी 4.30 ते 6.30 पर्यंत गाभार्‍यात भाविकांना प्रवेश नव्हता. यावेळेस सिद्धीविनायकाला जलाभिषेक करण्यात आला. मात्र, भाविकांना संध्याकाळी ग्रहण समाप्तीनंतर 7 वाजल्यापासून दर्शन घेता आले. खंडग्रास सूर्यग्रहणामुळे आजच्या दैनंदिन कार्यक्रमात बदल करण्यात आले होते. दुपारी 4.40 मिनिटे ते सायंकाळी
6.31 मिनिटांपर्यंत साई समाधीचे दर्शन बंद ठेवण्यात आले होते. दरम्यानच्या काळात साईबाबांच्या मूर्तीसमोर मंत्रोच्चार करण्यात आला. समाधी 9 मंदिराच्या सभा मंडपातून साईभक्तांना मूर्तीचे दर्शन घेता येणार आहे. सायंकाळी 7.15 वा. धुपारती पार पडली. त्यानंतर भाविकांच्या दर्शनरांगा पूर्ववत सुरू झाल्या. खंडग्रास सूर्यग्रहण काळात विठुरायाचे दर्शन घेता आले. भाविकांच्या दर्शनात मात्र कोणताही बदल केला नसल्याने देशभरात आलेल्या भाविकांना विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेता आले. मात्र विठुरायाच्या रोजच्या नित्योपचारात बदल करण्यात आला होता. पुणे दगडूशेठ मंदिर आज दुपारी 4 ते सायंकाळी 7 बंद ठेवण्यात आले होते. ग्रहण काळात कसबा मंदिर खुले होते. मात्र गणपतीची मूर्ती झाकली होती. देहू आणि आळंदी दोन्ही मंदिरे खुली ठेवण्यात आली होती. अमरावती येथील अंबादेवी आणि एकविरा देवी मंदिर ग्रहणामुळे मूर्ती समोर पडदा लावण्यात आला होता. आज दुपारी 12 वाजता ही मंदिरे पूर्ण बंद करण्यात येऊन सायंकाळी 6 वाजता भाविकांसाठी खुले करण्यात आले. आज वर्षातील शेवटचे खंडग्रास सूर्यग्रहण झाले. 27 वर्षार्ंनी हा योग आला. आजचे ग्रहण भारतात सुमारे 2 तास दिसले. हे देशाच्या बहुतांश भागात पाहिले गेले. देशात पहिल्यांदा सूर्यग्रहण अमृतसरमध्ये संध्याकाळी 4.19 मिनिटांनी दिसले. त्याचवेळी महाराष्ट्रात पालघर येथे प्रथम पाहायला मिळाले. खगोलप्रेमींनी मोठ्या उत्साहात निसर्गाचा अविष्कार पाहिला. मुंबईत संध्याकाळी 6.09 पर्यंत सूर्यग्रहण दिसले. बहुतेक ठिकाणी सूर्यास्तानंतर ग्रहण संपेल. भारतापूर्वी जगातील विविध देशांमध्ये सूर्यग्रहण पाहायला मिळाले होते. अमेरिका, युरोप, उत्तर-पूर्व आफ्रिका, मध्य पूर्व आणि पश्चिम आशियामध्ये दिसले. वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण आइसलँडमधून दुपारी 2.29 वाजता सुरू झाले. भारतात ग्रहण 4.29 वाजता सुरू झाले असून ते संध्याकाळी 6.09 वाजता संपले. आजच्या सूर्यग्रहणानंतर 8 नोव्हेंबरला चंद्रग्रहण आहे. आता 2032 ला पुढील खंडग्रास सुर्यग्रहण दिसणार आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Close Bitnami banner
Bitnami