संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Tuesday, 05 July 2022

सेन्सेक्स व निफ्टीमधील नेमका फरक समजून घ्या

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

सेन्सेक्सने मागे विक्रमी 62,000 ची पातळी ओलांडली आणि याविषयीची चर्चा अखंड सुरू आहेत. त्यामागील कारणेही तशीच आहेत. समजा तुम्ही 10 वर्षांपूर्वी 1 लाख रुपयांची एफडी (मुदत ठेव) केली. त्यातून तुम्हाला जास्तीत जास्त 1.87 लाख रुपये मिळाले. पण हीच रक्कम तुम्ही सेन्सेक्समध्ये गुंतवली असती तर ही रक्कम जवळपास 2.80 लाख रुपये झाली असती.

पण मार्केट गेल्या काही दिवसात पडलेच नाही का? होय पडले. पण बाजारातील ती घसरण (त्याला मार्केट करेक्शन (सुधार) असेही म्हणता येईल) ही अधिक मजबुतीने पुढे जाण्यासाठीची असते. त्यामुळे तुम्ही मागील वर्षी सेन्सेक्समध्ये गुंतवणूक केली असती किंवा बाजार घसरण्यापूर्वी गुंतवणूक केली असती, तर तुमच्या गुंतवणुकीत 25% ची भर पडली असती.

पण ‘सेन्सेक्स’म्हणजे नेमके काय? त्याप्रमाणेच ‘निफ्टी’ म्हणजे काय? यामध्ये नेमका काय फरक आहे याबद्दल जरा येथे समजावून घेऊ या –

सर्वप्रथम इंडेक्स (निर्देशांक) काय असतात, ते पाहुयात.

इंडेक्स (निर्देशांक) म्हणजे काय? :

बाजाराच्या कामगिरीचा आढावा घेण्याचे प्रमाणित स्वरुप म्हणजे इंडेक्स अथवा निर्देशांक. या निर्देशांकात विशिष्ट एक्सचेंज (बीएसई किंवा एनएसई)वरील शेअर ट्रेडिंग ग्रुपचा समावेश होतो. यातून बाजारातील विशिष्ट भागातील कामगिरी कळते. असे निर्देशांक एक तर सेन्सेक्स व निफ्टी यासारख्या व्यापक आधारावर असू शकतात किंवा ते बँक निफ्टी किंवा बीएसई ऑटो इंडेक्ससारखे अधिक विशेष असू शकतात. दुसऱ्या शब्दात सांगायचे झाल्यास, बीएसईवरील बाजाराची स्थिती सेन्सेक्स दर्शवतो तर एनएसईच्या बाजाराची स्थिती निफ्टीतून दर्शवली जाते.

त्यांना सेन्सेक्स किंवा निफ्टी का म्हणतात, ते कशाप्रकारे वेगळे आहेत?

बेंचमार्क निर्देशांक असल्याने सेन्सेक्स आणि निफ्टी हे दोघेही व्यापक प्रमाणातील बाजारातील पैलूंचा आढावा घेतात. सेन्सेक्स हा शब्द म्हणजे ‘बीएसई सेन्सेटिव्ह इंडेक्स’ या संकल्पनेचे लहान स्वरुप आहे. त्याचप्रमाणे एनएसई फिफ्टीचे लहान स्वरुप म्हणजे निफ्टी! या दोन्ही निर्देशांकातील प्रमुख फरक पुढीलप्रमाणे :

शेअरची संख्या : सेन्सेक्स आणि निफ्टीमधील प्रमुख फरक म्हणजे त्यावर व्यापार होणाऱ्या स्टॉक्स अथवा शेअर्सची संख्या. सेन्सेक्स या बेंचमार्क निर्देशांकात 30 स्टॉकचा समावेश होतो तर निफ्टी 50 निर्देशांकात एकूण 50 शेअरचा समावेश होतो.

मोजण्याची पद्धत : स्टॉक्सचे मूल्य पैशांमध्ये असले तरी निर्देशांक अंकांनीच गणले जातात. मग की अंक किंवा पॉइंट्सची पद्धत नेमकी काय आहे? ही अंकांची प्रणाली फ्री-फ्लोट, बाजार भांडवलीकरणाच्या वजनाची पद्धत यानुसार मोजली जाते. हे करण्याचे सूत्र पुढीलप्रमाणे आहे :

सध्याची मार्केट व्हॅल्यू/बेस मार्केट कॅपिटल बेस इंडेक्स व्हॅल्यू. यातील फरक म्हणजे सेन्सेक्समध्ये 100 चा बेस इंडेक्स व्हॅल्यू वापरला जातो तर निफ्टीमध्ये तो 1000 चा वापरला जातो.

स्थापनेचा दिवस व आधार वर्ष : सेन्सेक्स 1 जानेवारी 1986 रोजी स्थापन झाला. 1978-79 ही त्याची आधार वर्ष होती. निफ्टी 22 एप्रिल 1996 रोजी सुरुवातीला पूर्ण बाजार भांडवलीकरणाच्या पद्धतीसह सुरू झाले. 26 जून 2009 रोजी ते फ्री-फ्लोट पद्धतीप्रमाणे बदलले. त्याचा आधार कालावधी हा 53 नोव्हेंबर 1995 एवढा होता.

या तीन मुद्यांसह, पुन्हा एकदा अधोरेखित करावे वाटते की, सेन्सेक्स हा बीएसईमार्फत कार्यान्वित होतो तर निफ्टी हा एनएसईमार्फत चालवला जातो.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami