जालना – सेवली गावात एका रात्रीत छत्रपती शिवाजी महाराजांचा विना परवानगी बसवलेला पुतळा जिल्हा प्रशासनाने मंगळवारी रात्री हटवला. या प्रकरणी २० जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. गावातील वडाच्या झाडाखाली रोवलेला हिरवा झेंडाही काढून टाकला आहे. या प्रकरणात २० ते २५ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ग्रामसेवकांच्या तक्रारीवरून गुन्हे दाखल झाले आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली.
जालना तालुक्यातील सेवली गावात सोमवारी रात्री काही शिवप्रेमींनी एका रात्रीत ८ फूट उंचीचा छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा बसवला होता. त्यासाठी त्यांनी कोणाचीही परवानगी घेतली नव्हती. हा प्रकार मंगळवारी सकाळी लक्षात आल्यानंतर गावात कडक पोलिस बंदोबस्त तैनात केला होता.
जिल्हाधिकाऱ्यांनी हा पुतळा हटवण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार मंगळवारी रात्री पोलिस बंदोबस्तात हा पुतळा हटवण्यात आला. या प्रकरणात ग्रामसेवकांच्या फिर्यादीवरून २० जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याशिवाय वडाच्या झाडाखाली हिरवा झेंडा रोवून टिपू सुलतान जिंदाबाद अशा घोषणा देणाऱ्या २० ते २५ जणांविरुद्ध पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. या घटनांनंतर गावात तणाव पसरला आहे. त्यामुळे तेथे पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.