रायपूर :- रायपूरमध्ये सुरू असलेल्या काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनामध्ये काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी आज दुसऱ्या दिवशीच्या भाषणाला सुरवात करताना काँग्रेसचा पुढचा नारा दिला. ‘सेवा, संघर्ष और बलिदान.. सबसे पहिले हिंदुस्थान’ या घोषणेने काँग्रेस आता पुढच्या काळात आपला प्रवास करणार आणि येणाऱ्या २०२४ च्या निवडणुकीसाठी तयारी करणार असे त्यांनी आज म्हटले.
गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसला उभारी देण्यासाठी पक्षाचे अध्यक्ष, नेते आणि कार्यकर्ते सर्वजण अॅक्शन मोडमध्ये आहेत. काही दिवसांपूर्वीच राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा पूर्ण केली. अशातच आता काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी नवी घोषणा देत काँग्रेसला उभारी दिली. यावेळी खर्गेंनी भावूक होऊन आपली भूमिका मांडली ते म्हणाले, काँग्रेस जनतेचा विश्वास हीच माझी आयुष्यभराची कमाई आहे, हे फक्त काँग्रेसमध्येच शक्य आहे, जो एकेकाळी ब्लॉक काँग्रेस कमिटीचा अध्यक्ष होता, आता भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा अध्यक्ष आहे. गांधीजी, नेहरू, पटेल, बोस, आझाद, राजेंद्र प्रसाद, इंदिरा, राजीवजी यांनी आपल्या त्याग आणि बलिदानाने ज्या गौरवशाली वारसा जपला आहे, त्या गौरवशाली वारशाचे मी आणि तुम्ही प्रतिनिधित्व करत असल्यामुळे आज मी देखील भावूक झालो आहे.’
दरम्यान खर्गे यांनी आपल्या भाषणातून भाजपवर बोचरी टीका केली. ते म्हणाले, ‘दिल्लीच्या सरकारमध्ये बसलेल्या लोकांचा डीएनए गरीबविरोधी आहे, हे सांगायला मला अजिबात संकोच नाही. एकीकडे देशातील संस्थांवर आणि गरिबांवर हल्ले होत आहेत तर दुसरीकडे चीनच्या अतिक्रमणापुढे भारताने हात टेकले आहेत.’