नवी दिल्ली – काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधींनी त्यांच्या १० जनपथ येथील निवासस्थानाच्या भाड्याची रक्कम मागील दोन वर्षांपासून भरलेली नसल्याची माहिती समोर आली आहे. तसेच काँग्रेस पक्षाने त्यांच्या मुख्य कार्यालयाबरोबरच इतर अनेक इमारतींची भाडी थकवल्याची माहिती आरटीआय म्हणजेच माहिती अधिकार कायद्याअंतर्गत समोर आली. याच पार्श्वभूमीवर भाजपाने आता सोनिया गांधी यांच्या घराबरोबरच काँग्रेसशीसंबंधित इतर इमारतींचं भाडं भरण्यासाठी वर्गणी गोळा करण्याची मोहीम हाती घेतली आहे.
केंद्रीय शहर विकास आणि निवास मंत्रालयाने आरटीआय कार्यकर्ता सुजित पटेल यांनी दाखल केलेल्या अर्जाला उत्तर देताना थकीत भाडेपट्टीसंदर्भातील माहिती दिली.
माहिती अधिकार अर्जाला मंत्रालयाने दिलेल्या उत्तरामध्ये काँग्रेस पक्षाच्या मुख्य कार्यालयाचं १२ लाख ६९ हजार ९०२ रुपयांचं भाडं थकलेलं असल्याचे म्हटले आहे . २०१२ मध्ये या कार्यालयाचं शेवटचं भाडं भरण्यात आलं होतं. तर सोनिया गांधींच्या घराचं ४ हजार ६१० रुपये भाडं अद्याप भरण्यात आलेलं नाहीय. सप्टेंबर २०२० मध्ये या घराचं शेवटचं भाडं देण्यात आलं होतं. त्याचप्रमाणे चाणक्यपुरीमध्ये राहणाऱ्या सोनिया गांधींचे खासगी सचिव विसेंट जॉर्ज यांच्या बंगल्याचंही भाडं बाकी आहे.
जॉर्ज हे सी १०९ बंगल्यामध्ये वास्तव्यास असून या बंगल्याचं ५ लाख ७ हजार ९११ रुपये भाडं बाकी आहे. या बंगल्याचं शेवटचं भाडं ऑगस्ट २०१३ मध्ये भरण्यात आले आहे. मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार सर्व राष्ट्रीय आणि स्थानिक पक्षांना तीन वर्षांमध्ये स्वत:चं कार्यालय स्थापन करावं लागतं. त्यानंतर त्यांना सरकारी बंगला रिकामा करावा लागतो. काँग्रेसला ९ ए राउस एव्हेन्यूमध्ये जमीन देण्यात आली असून यावर त्यांनी पक्षाचं कार्यालय उभारणं अपेक्षित आहे. काँग्रेसने २०१३ मध्ये २४ अकबर रोडवरील बंगल्यातील आपलं कार्यालय रिकामं करणं अपेक्षित होतं, जे अद्यापही खाली करण्यात आले नाही.
दरम्यान, सध्या या पूर्ण प्रकरणामध्ये भाजपाने वर्गणी गोळा करण्याची मोहीम सुरु केली आहे. भाजपाचे नेते तेजिंदर पाल सिंह बग्गा यांनी वर्गणी गोळा झाल्यानंतर ती आम्ही सोनिया गांधींना पाठवून देऊ असं म्हटलं आहे.