पुणे – पुणे महापालिकेत किरीट सोमय्यांना झालेल्या धक्काबुक्कीची दखल आता केंद्रीय गृहमंत्रालयाकडून घेण्यात आली आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी सीआयएसएफचे पथक पुण्यात दाखल झाले असून हे पथक केंद्र सरकारला अहवाल सादर करणार आहेत. या पथकाच्या अधिकार्यांनी पुणे पोलीस आयुक्तांची भेट घेऊन चर्चा केली.
केंद्रीय गृहमंत्रालयाने माजी खासदार किरीट सोमय्यांना सीआयएसएफ जवानांची सुरक्षा पुरवली असून काही दिवसांपूर्वी सोमय्या हे पुणे महापालिकेत दाखल होताच शिवसैनिकांनी धक्काबुक्की केली. या धक्काबुक्कीमुळे सोमय्या जमिनीवर कोसळले. त्यात त्यांच्या हाताला गंभीर इजा झाली. त्यानंतर आक्रमक झालेल्या भाजपा नेत्यांनी गृहमंत्री अमित शहा आणि राज्यपालांना पत्राद्वारे तक्रार दाखल केली होती. यानंतर केंद्रीय गृहमंत्रालयाने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन पुण्यात चौकशीसाठी सीआयएसएफचे पथक धाडले. आता हे पथक आपल्या अहवालात काय मांडते हे पाहावे लागणार आहे. दरम्यान, याप्रकरणी सध्या शिवसेनेच्या अनेक कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले असून त्यांना अटकही करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना जामीन मंजूर झाला.