मुंबई: – राज्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. याचा मोठा फटका राज्यातील शेतकऱ्यांना बसला आहे.सोयाबीन बाजारभाव पाहिले तर हंगाम सुरू झाल्यापासून दरात मोठी घसरण होत आहे.अनेक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हमीभावापेक्षा कमी किमान बाजार भाव मिळत आहे. त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी होत आहे.
गेल्या वर्षी सोयाबीनला अकरा हजार रुपये प्रतिक्विंटल पर्यंतचा कमाल बाजार भाव मिळाला होता. साधारण बाजार भाव देखील साडे सात हजाराच्या घरात होता. त्यामुळे यावर्षी सोयाबीनला तसाच बाजार भाव मिळेल या आशेने शेतकरी बांधवांनी सोयाबीनचा पेरा वाढवला. विपरीत परिस्थिती असताना देखील सोयाबीनची पेरणी करण्यात आली. पावसाच्या लहरीपणाचा फटका बसल्याने सोयाबिनच्या उत्पादनात घट झाली आहे.शिवाय आता गेल्या तीन महिन्यांपासून सोयाबीनला पाच हजार रुपये प्रति क्विंटलच्या आसपास बाजार भाव मिळत असल्याने सोयाबीन उत्पादक संकटात सापडले आहेत.
सोयाबीनला चांगला बाजारभाव मिळतो त्यामुळे जास्त पैसा देणारे पीक आहे. मात्र तयार सोयाबीन परतीच्या पावसाने अक्षरश: कुजले आहे, भिजलेले सोयाबीन वाया गेले आहे. सोयाबीनच्या पैशावरच अनेक शेतकर्यांची दिवाळी अवलंबून राहते. मात्र पीकच वाया गेल्याने शेतकऱ्यांची दिवाळी सुनीसुनीच जात आहे. बाजारात देखील अपवादानेच शेतकरी खरेदीसाठी आलेला दिसतो.