सोलापूर – सोलापूरमध्ये आता रिक्षातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना पहिल्या दीड किलोमीटरसाठी २३ रुपये आणि त्यापुढील प्रत्येक एक किलोमीटरसाठी १५ रुपये मोजावे लागणार आहेत. सोलापूर आरटीओ कार्यालयाने हा भाडेवाढीचा निर्णय घेतला असून उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड यांनी त्यास शनिवारी मान्यता दिली. सोमवारपासून ही भाडेवाढ लागू होणार आहे.
यापूर्वी, साधारणत: २०१२ मध्ये येथे रिक्षांचे भाडे वाढवले होते. त्यावेळी ५५ ते ६० रुपये प्रतिलिटर डिझेलचा दर होता आणि सध्या डिझेल १०० रुपयांवर पोहोचले आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन प्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी अमरसिंह गवारे, सहाय्यक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय तिराणकर यांच्या बैठकीत भाडेवाढीचा निर्णय झाला. दरम्यान, ऑटोरिक्षांमधील मीटरचे पुन्हा प्रमाणीकरण केले जाणार आहे. त्यासाठी ९० दिवसांची मुदत देण्यात आली आहे. मुदतीत हे काम करून न घेतल्यास कमीत कमी सात दिवस ते जास्तीत जास्त ४० दिवसांसाठी त्या रिक्षाचा परवाना निलंबित होईल, असा इशारा आरटीओ अधिकाऱ्यांनी दिला आहे.
विशेष म्हणजे जिल्ह्यात तब्बल दहा वर्षांनी ऑटोरिक्षांच्या भाडेवाढीचा निर्णय झाल्याने एकेकाळी रिक्षाचालक असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमच्या व्यथा समजून घेतल्या, अशी भावना येथील रिक्षाचालक व्यक्त करत आहेत.