सोलापूर – जिल्ह्यातील उजनी धरणातून सोलापूर शहराला पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी फुटल्याची घटना आज शनिवारी घडली. माढा तालुक्यातील सापटणे गावा जवळ जलवाहिनी फुटली आहे. यामुळे साेलापूरचा पाणी पूरवठा विस्कळीत हाेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
आज सकाळी सापटणे गावा जवळ जलवाहिनी फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले आहे. त्यामुळे परिसरात पाण्याचा फवारा मोठ्या प्रमाणावर उडाला. या परिसरात अधिका-यांचे दुर्लक्ष असल्याने वारंवार गळती सुरू आहे असा आराेप ग्रामस्थांनी केला आहे.दरम्यान,जलवाहिनीची गळती राेखण्यासाठी तातडीने ठाेस पावले उचलली जावीत अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे. या घटनेमुळे उद्या रविवारी साेलापूर शहराच्या पाणी पूरवठ्यावर परिणाम हाेऊ शकताे. तरी नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा,असे आवाहन करण्यात आले आहे.