नवी दिल्ली – भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष सौरव गांगुली यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना कोलकातामधील मल्टीस्पेशालिटी रुग्णालय वुडलँड्स येथे दाखल करण्यात आले होते. मात्र, आता त्यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
सौरव गांगुली यांना 3 दिवसांपूर्वी कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले होते. तसेच त्यांना कोरोनावरील उपचारासाठी कोलकात्यातील वुडलँड रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर 3 डॉक्टरांच्या पथकाने सौरव गांगुलींवर सतत देखरेख ठेवली. सौरव यांचा कोविड नमुना जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आला होता. या अहवालाच्या आधारे असे सांगण्यात आले की सौरव गांगुली यांच्या नमुन्यात ओमिक्रॉनची लागण झालेली नाही. अखेर दोन दिवसांच्या उपचारानंतर सौरव गांगुली यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. या वर्षात गांगुलींना रुग्णालयात दाखल करण्याची ही दुसरी वेळ होती. याआधी वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच जानेवारी 2021 मध्ये त्यांना हृदयविकाराच्या समस्येमुळे बराच काळ रुग्णालयात राहावे लागले होते.