संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Saturday, 21 May 2022

स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या तिजोरीतून तब्बल ११ कोटी रुपयांच्या नाण्यांची चोरी

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email
Print

जयपूर – देशातील बॅंकिंग क्षेत्रात एक खळबळजनक घटना समोर आली आहे. भारतातील सर्वात मोठी बॅंक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या राजस्थानातील एका शाखेच्या तिजोरीतून तब्बल ११ कोटी रुपयांची नाणी चोरीला गेल्याची माहिती नुकतीच समोर आली आहे. राजस्थानच्या मेहंदीपूर बालाजी येथील एसबीआय शाखेच्या तिजोरीतून ११ कोटी रुपयांची ही नाणी गायब झाली. सीबीआय या प्रकरणाचा तपास करत आहे. यासंदर्भात अधिकाऱ्यांनी काल सोमवारी माहिती दिली.

विशेष म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडियाने या प्रकरणाच्या सीबीआय चौकशीसाठी राजस्थान उच्च न्यायालयात धाव घेतली होती. राजस्थान उच्च न्यायालयाने हा तपास सीबीआयकडे सोपवला आहे. आता सीबीआयने हे प्रकरण स्वत:च्या हातात घेत तपास सुरू केला आहे. गायब झालेली रक्कम ११ कोटींहून अधिक असल्याचे सांगण्यात येत आहे. प्राथमिक तपासानंतर एसबीआयने या नाण्यांची मोजणी सुरू केली तेव्हा एसबीआय शाखेतून नाण्यांच्या चोरीचे प्रकरण उघडकीस आले. यादरम्यान बँकेतील रोख रक्कमेची हेराफेरी झाल्याचे निदर्शनास आले. जयपूरमधील एका खासगी कंत्राटदाराला १३ कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमतीची नाणी मोजण्याची जबाबदारी देण्यात आली होती. या मोजणीदरम्यान शाखेतून ११ कोटींहून अधिक किमतीची नाणी गायब झाल्याचे आढळून आले. या तपासणीत आतापर्यंत केवळ ३ हजार नाण्यांनी भरलेल्या पिशव्या म्हणजेच २ कोटी किंमतीच्या नाण्यांचा हिशेब समोर आला आहे. ते आरबीआयच्या कॉईन होल्डिंग शाखेत जमा करण्यात आले आहेत. म्हणजेच एसबीआयच्या शाखेतून ११ कोटी रुपयांची नाणी गायब आहेत. यानंतर एसबीआयने एफआयआर दाखल केला. या एफआयआरमध्ये असे सांगण्यात आले आहे की, १० ऑगस्ट २०२१ रोजी गेस्टहाऊसमध्ये नाण्यांचे ऑडिट करणाऱ्या कर्मचाऱ्यांना धमकावण्यात आले आणि नाणी मोजण्यापासून दूर राहण्यास सांगण्यात आले. मात्र, हे प्रकरण आता सीबीआयच्या हाती असून तपासानंतरच निर्णय समोर येईल.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami