माद्रिद – स्पेन आणि पोर्तुगालमध्ये उष्णतेची दुसरी लाट आली. त्यामुळे येथील तापमानात कमालीची वाढ झाल्याने नागरिक उकाड्याने हैराण झाले आहेत. स्पेनमधील हवामान संस्थेच्या माहितीनुसार, सोमवारी सायंकाळी ६ नंतर मध्यवर्ती शहर असलेल्या कॅन्डेलेडामधील तापमान ४३.३ अंश सेल्सिअसवर पोहोचले होते. त्यामुळे स्पेनमधील नागरिक उष्ण हवेने भाजून निघाले.
स्पेन आणि पोर्तुगालचे तापमान काही दिवसांपासून प्रचंड वाढले आहे. त्यात या महिन्यात सोमवारी दुसऱ्यांदा उष्णतेची लाट आली. स्पेनमधील अनेक शहरांमध्ये ४३ अंश सेल्शिअसपेक्षा जास्त तापमानाची नोंद झाली. स्पेनच्या दक्षिणेतील सेव्हिल शहरात ४२.४, बडोजाज आणि मेरिडात ४२ अंश एवढ्या तापमानाची नोंद झाली. गुरुवारी आणि शुक्रवारी या दोन शहरांतील तापमान ४६ आणि ४५ अंश सेल्सियसपर्यंत जाईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. फ्रान्स व ब्रिटनमध्येही तापमान वाढीची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. जूनमध्ये स्पेनमधील तापमान वाढीमुळे नागरिक हैराण झाले होते. त्यानंतर आता जुलैमध्येही अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे.