संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 19 January 2022

स्मृतीदिन: भारताचे माजी बहारदार फलंदाज कॅप्टन भाऊसाहेब निंबाळकर

Share on facebook
Facebook
Share on twitter
Twitter
Share on whatsapp
WhatsApp
Share on telegram
Telegram
Share on email
Email
Share on print
Print

डोमेस्टिक स्तरावरील भारताचे माजी बहारदार फलंदाज कॅप्टन भाऊसाहेब निंबाळकर यांचा आज स्मृतीदिन. त्यांचा जन्म १२ डिसेंबर १९१९ रोजी झाला.

कोल्हापूरच्या लाल मातीत कुस्ती खऱ्या अर्थाने बहरली. त्या खालोखालच फुटबॉल, क्रिकेट खेळ यांसारखे खेळही या मातीत रुजले. इंग्रजांनी भारतात क्रिकेट आणले आणि भारतात हा खेळ वाढीस लागला. स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळात क्रिकेट भारतात आपली पाळेमुळे पसरत असताना ज्या क्रिकेटपटूंची खऱ्या अर्थाने त्याच्या प्रसाराचे कार्य केले, त्या खेळाडूंमध्ये कॅप्टन भाऊसाहेब निंबाळकर यांचा समावेश करावा लागेल. रणजी क्रिकेटमध्ये विक्रमवीर ठरलेला हा खेळाडू दोन तपांहून अधिक काळ मैदान गाजवत राहिला. कर्नल सी. के. नायडू कर्णधार असलेल्या संघात एकाच वेळी भाऊसाहेब निंबाळकर, सयाजी धनवडे, दादासाहेब जगदाळे अशा तिघा कोल्हापूरकरांचा समावेश होता. यापैकी निंबाळकरांची कारकीर्द उत्तरोत्तर वाढत राहिली.

१९४८-४९ सालच्या हंगामात काठियावाड संघाविरुद्ध खेळताना त्यांनी नाबाद ४४३ धावांची खेळी केली. तेव्हा प्रतिस्पर्धी संघाने खेळण्यास नकार दिला नसता तर भाऊसाहेबांनी डॉन ब्रॅडमनचा नाबाद ४५२ धावांचा विक्रम मोडला असता. मात्र त्यानंतर दस्तुरखुद्द ब्रॅडमन यांनी पत्र पाठवून भाऊसाहेबांच्या जिगरबाज खेळीचे कौतुक केले होते. उजव्या हाताने फलंदाजी करताना भाऊसाहेबांनी ८० सामन्यांत ४,८४१ धावा जमवतानाच १२ शतके, २२ अर्धशतके ठोकली. शिवाय ५८ फलंदाज बाद करीत उत्कृष्ट गोलंदाज असल्याचेही दाखवून दिले. भाऊसाहेब घराण्यात क्रिकेटची प्रदीर्घ परंपरा आहे. त्यांच्या चार पिढय़ा क्रिकेटमध्ये रमल्या. भाऊसाहेबांचे वडील बाबासाहेब निंबाळकर हे कोल्हापूर संस्थान संघाचे कर्णधार होते. छत्रपती शहाजी महाराज यांचे एडीसी म्हणून काही काळ भाऊसाहेबांनी काम पाहिले. होळकर संस्थानाने त्यांना कॅप्टन हे मानाचे पद दिले. रेल्वे पोलीसमधून पोलीस उपाधीक्षकपदावरून निवृत्त झाले तरी भाऊसाहेब क्रिकेटशी अखेरच्या क्षणापर्यंत जोडले गेले होते. प्रथम श्रेणी क्रिकेटमधील सर्वाधिक वैयक्तिक धावांच्या पंक्तीमध्ये सध्या निंबाळकर चौथ्या स्थानावर आहेत. प्रतिस्पर्धी संघाने पळ काढल्यामुळे त्यांना ब्रॅडमन यांचा विक्रम मोडणे जमले नाही. कसोटी खेळण्याचे भाग्य त्यांना लाभले नाही. भाऊसाहेब निंबाळकर यांचे ११ डिसेंबर २०१२ रोजी निधन झाले.

संजीव वेलणकर, पुणे,

९४२२३०१७३३

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Close Bitnami banner
Bitnami