संभाजीनगर : प्रेयसीने लग्नाला नकार दिल्याने टोकाचे पाऊल उचलत स्वतःवर पेट्रोल टाकून जाळून घेत प्रेयसीला मिठी मारणारा गजानन मुंडे या प्रियकराची मृत्यूशी झुंज अखेर संपली.आज उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. काल संध्यकाळी संभाजीनगरच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसरात घडलेल्या या धक्कादायक घटनेत ९५ टक्के भाजलेल्या गजाननचा मृत्यू झाला असून, प्रेयसी पूजावर उपचार सुरू असल्याचे समजते.
गजानन मुंडे आणि त्याची प्रेयसी पूजा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या शासकीय न्याय सहाय्यक विज्ञान संस्थेत जीवभौतिकशास्त्र या विषयात पीएचडी करत होते. या विद्यापीठातच दोघांची ओळख झाली आणि ओळखीचं रुपांतर प्रेमात झाले. परंतु, काही दिवसांपूर्वी त्यांच्यात वाद झाला. गजानन हुशार विद्यार्थी असल्याने त्याच्या प्राध्यापकांनी त्याची समजूतही काढली होती. परंतु, गजाननने पूजाच्या मागे लग्नाचा तगादा लावला. त्याच्या त्रासाला वैतागून पूजाने त्याची पोलिसांत तक्रारही केली. तरीही गजानन तिच्या मागे असायचा. त्यादिवशी देखील विद्यापीठाच्या परिसरात दोघांमध्ये वाद झाला. यातूनच गजानने स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून जाळून घेत पूजालाही मिठी मारली. या घटनेत दोघेही गंभीर जखमी झाले. या आगीत गजानन ९५ टक्के भाजला होता. उपचारांदरम्यान त्याचा मृत्यू झाला. तर, पूजावर अद्यापही उपचार सुरू आहेत.